भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान बनले. सुनक यांनी मंगळवारी किंग चार्ल्स तिसरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर औपचारिकपणे ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला. बँकर ते राजकारणी असा प्रवास करणारे ४२ वर्षीय सुनक हे २१० वर्षांतील ब्रिटनचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. ते ब्रिटनचे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर भारतीय व्यक्ती बसणार याची भविष्यवाणी २०१५ मध्ये खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच समोर झाली होती. सात वर्षांनी ती खरीदेखील ठरली आहे.
सुनक यांनी लंडनमध्ये १०, डाउनिंग स्ट्रीट येथे आपल्या पहिल्या संबोधनात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या ब्रिटनवासीयांना यातून बाहेर पडण्याचा विश्वास दिला. राजकारणापेक्षा तुमच्या गरजांना प्राधान्य दिले जाईल. एकत्रितपणे आपण अविश्वसनीय गोष्टी साध्य करू शकतो, असे ते म्हणाले.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेविड कॅमेरून यांनी २०१५ मध्ये केलेले वक्तव्य सात वर्षांनी खरे ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हा ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी लंडनच्या वेम्बले स्टेडियममध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेव्हा अनिवासी भारतीयांना संबोधित करताना तत्कालीन पीएम डेव्हिड कॅमेरून यांनी म्हटले होते, तो दिवस दूर नाहीय, जेव्हा एखादा भारतीय नागरिक ब्रिटनचा पंतप्रधान होईल. आता सात वर्षांनी म्हणजेच २०२२ मध्ये कॅमेरून यांची भविष्यवाणी खरी ठरली आहे. भारतीय वंशाचे सुनक ब्रिटनचे पंतप्रधान बनले आहेत.