श्रीनगर: ज्येष्ठ पत्रकार आणि जम्मू काश्मीरमधील रायझिंग काश्मीरचे संपादक सुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. श्रीनगरमधील प्रेस कॉलनी परिसरात बुखारी यांच्यावर हल्ला झाला. यामध्ये ते गंभीर झाले. यानंतर त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सुजात बुखारी जम्मू काश्मीरमधून प्रकाशित होणाऱ्या रायझिंग काश्मीर या दैनिकाचे संपादक होते. त्यांच्या मृत्यूनंतर जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दु:ख व्यक्त केलं. मुफ्ती यांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. बुखारी यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशा शब्दांमध्ये त्यांनी श्रद्धांजली व्यक्त केली. तर राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेनं आपल्याला धक्का बसल्याचं म्हटलं. श्रीनगरच्या प्रेस कॉलनीमध्ये बुखारी यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात एक एसपीओ जखमी झाला आहे. रायझिंग काश्मीरचे संपादक सुजात बुखारी यांच्या हत्येवर राहुल गांधींनीही दुःख व्यक्त केलं आहे. निर्भीड पत्रकारितेसाठी त्यांनी अखेरपर्यंत लढा दिला. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.