श्रीनगर : मंगळवारी जम्मू-काश्मिरातील हवामानात सुधारणेसोबतच पुराचा धोका कमी झाला असून झेलम नदीच्या पाण्याची पातळीही खाली घसरत चालली आहे. दरम्यान, बडगाम जिल्ह्यात दरडी कोसळलेल्या स्थळी आणखी सहा मृतदेह आढळले असून पुरात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १६ झाली आहे.राज्यात ढगाळ वातावरण असले तरी गेल्या २४ तासांत पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुराचा धोका कमी झाला आहे. दुसरीकडे पावसाच्या पाण्यात वेढलेल्या घरांमधून लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची आठ पथके कार्यरत असून चार हेलिकॉप्टरसह सशस्त्र दलही सज्ज ठेवण्यात आले आहे. पूर परिस्थितीतील सुधारणा लक्षात घेऊन काश्मीर विद्यापीठाच्या परीक्षा बुधवारपासून पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. खोऱ्यातील विद्यमान पूरस्थिती हाताळण्यास विनाकारण विलंब होत असल्याचा आरोप करून नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या सदस्यांनी मंगळवारी विधानसभेत सभात्याग केला, तर सत्ताधारी पीपल्स डेमॉक्रेटिक पक्षाचे दोन सदस्य मुश्ताक अहमद शाह आणि जहूर मीर यांनीसुद्धा त्यांच्या मतदारसंघात साचलेले पाणी काढण्यासाठी पंप उपलब्ध करून न दिल्याच्या विरोधात बहिर्गमन केले.पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी जम्मू-काश्मीर पोलिसांनी स्थापन केलेल्या विशेष नियंत्रण कक्षात गेल्या दोन दिवसांत ३० हजार कॉल्स आणि एसएमएस आले. (वृत्तसंस्था)
काश्मिरातील पुराचा धोका ओसरला
By admin | Published: April 01, 2015 1:33 AM