ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - आम आदमी पार्टीचे मंत्री, आमदार, नेतेमंडळी कोणत्या-न्-कोणत्या तरी वादात नेहमीच सापडत असतात. आता ज्येष्ठ समाजसेवक यांच्याविरोधातील वादग्रस्त ट्विट रिट्विट केल्याने नवी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि "आप"चे नेते मनीष सिसोदिया हे टीकेचे धनी ठरले आहेत. अण्णा हजारे यांचा भारतीय जनता पार्टीचे एजंट म्हणून उल्लेख करणारे ट्विट सिसोदिया यांनी रिट्विट केल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून निशाणा साधण्यात येत आहे.
दरम्यान, अकाउंट हॅक करण्यात आल्याचे कारण सांगत सिसोदिया यांनी या प्रकरणातून आपली सुटका करण्याचा प्रयत्न केला आहे. "माझं अकाउंट हॅक करण्यात आले होते, व हॅकरनं अण्णा हजारेंविरोधात केलेले ट्विट माझ्या अकाउंटद्वारे रिट्विट केले. मी हे ट्विट डिलीट करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र संबंधित ट्विट डिलीट होत नाही", असे स्पष्टीकरण सिसोदिया यांनी दिले आहे.
शिवाय "अण्णा हजारेंप्रती माझ्या मनात प्रचंड सन्मान आहे. मी त्यांच्याविरोधात कोणत्याही गोष्टी बोलू शकत नाही. या ट्विटवर विश्वास ठेऊ नका", अशीही माहिती सिसोदिया यांनी ट्विटरवर दिली आहे. विशेष म्हणजे, अण्णा हजारेंविरोधात करण्यात आलेले ट्विटला 12 तासांहून अधिक काळ लोटल्यानंतर मनीष सिसोदिया यांच्याकडून अकाउंट हॅक झाल्याचा दावा करण्यात आला. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, दिल्ली महानगरपालिका निवडणुकीतील आम आदमी पार्टीचा दणदणीत पराभव झाल्यानंतर "आप" समर्थक अण्णा हजारे यांनाही टार्गेट करताना दिसत आहेत.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीने अण्णा हजारे यांना भाजपाचे एजंट ठरवत वादग्रस्त ट्विट केले. हेच ट्विट मनिष सिसोदिया यांनी रिट्विट केले. केवळ मनिष सिसोदिया यांनी हेच रिट्विट केले असे नाही तर याव्यतिरिक्त आणखी एक वादग्रस्त रिट्विट केले आहे ज्यात, "अण्णा केजरीवाल यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत, मात्र लोकपाल नियुक्त करण्यासाठी मोदींना येत असलेल्या अपयशाबाबत ते शांत का आहेत?", अशा आशय असलेले ट्विट सिसोदिया यांनी रिट्विट केले आहे.
दरम्यान, या प्रकरणावर अण्णा हजारे काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.