नवी दिल्ली : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांनी राजकारणात पदार्पण केले आहे. रिवाबा या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होत्या, त्यांनी जामनगर उत्तरमधून मोठा विजय मिळवून विधानसभेत प्रवेश मिळवला आहे. रिवाबा या भाजपच्या तिकिटावर 53 हजार 570 मतांनी विजयी झाल्या. एएनआयशी बोलताना रिवाबा यांनी पती रवींद्र जडेजाचे कौतुक केले. यासोबतच निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पतीसोबत झालेल्या संभाषणाचाही खुलासा केला आहे.
रिवाबा यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले, "पती जडेजा यांनी संपूर्ण प्रचारात त्यांना साथ दिली. या विजयाचे श्रेय मला त्यांनाही द्यायचे आहे. माझा नवरा म्हणून ते नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी मला प्रेरणा दिली आणि ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे."
मोदींनी वाढवला होता जड्डूचा उत्साहरिवाबा यांनी आणखी सांगितले की, त्यांच्यासाठी हा पहिलाच अनुभव होता आणि जेव्हा पंतप्रधान मोदी आले तेव्हा त्यांनी हसत खेळत सांगितले की रवींद्र, तुम्ही याआधी अशी फिल्डिंग कधीच केली नसावी. ते (रवींद्र जडेजा) माझ्यासाठी जे काही करू शकत होते, ते त्यांनी केले.
पत्नीच्या प्रचारासाठी जडेजा होता रिंगणातरिवाबा यांनी 2019 मध्ये भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले होते. या निवडणुकीतील त्यांच्या विजयाचा जामनगरमध्ये जल्लोष करण्यात आला. भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजाबद्दल भाष्य करायचे झाले तर, दुखापतीमुळे तो बराच काळ संघाबाहेर आहे आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. या ब्रेकमध्ये त्यांनी उघडपणे पत्नीचा निवडणुकीत प्रचार केला. विजयानंतर देखील जल्लोष करताना जडेजा पाहायला मिळाला. या निवडणुकीसाठी जडेजाने पूर्ण ताकद लावली होती, याच मेहनतीच्या जोरावर रिवाबा आमदार झाल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"