भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सध्या क्रिकेटपासून दूर आहे. अलीकडेच पार पडलेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत त्याची पत्नी रिवाबा जडेजा हिचा विजय झाला. पत्नीच्या विजयासाठी रविंद्र जडेजाही राजकीय मैदानात उतरल्याचं पाहायला मिळाला. अगदी उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही रविंद्र आपल्या पत्नीला नेहमीच बळ देण्याचं काम करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याने एक पोस्ट करुन पत्नीच्या कार्यक्षमतेचं कौतुक केलं होतं. आता, पुन्हा एकदा जडेजाने एक व्हिडिओ ट्विट करत पत्नीच्या नॉलेजचं कौतुक केलं आहे. पत्नी रिवाबाने RSS संबंधित विचारलेल्या प्रश्नावर दिलेल्या उत्तराने पती रविंद्र भारावून गेला.
रिवाबा ही गुजरातच्या जामनगर उत्तर येथून भारतीय जनता पार्टीची उमेदवार होती. रिवाबा हिने मोठा विजय मिळवून आमदार होण्याचा मान पटकावला. तिच्या या विजयात पती रवींद्र जडेजाचा देखील मोलाचा वाटा आहे. कारण, तो ठिकठिकाणी जाऊन भाजपला मतदान करण्याचे आवाहन करत होता. जड्डूने त्याच्या पत्नीसाठी एक खास पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधले होते. आता, पुन्हा एकदा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यावरुन, पत्नीच्या नॉलेजचं कौतुक रविंद्रने केले आहे.
या व्हिडिओत जडेजाची पत्नी रिवाबाला RSS संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, आरएसएसचा अर्थ रिबावाने सांगितला, त्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. आरएसएसबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, असा प्रश्न रिवाबाला विचारण्यात आला होता. त्यावर, भारतीय जनता पक्षाचे उगमस्थान म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. जगातील चौथी सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था. राष्ट्रीयता, राष्ट्रप्रेम, राष्ट्रधर्म, संघटन, एकता, त्याग, बलिदान या सर्वांचा मिलाप म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेव संघ... असे उत्तर रिवाबाने दिले. रिबावाचा हा व्हिडिओ ट्विट करत, तुझं हे ज्ञान पाहून चांगलं वाटलं, असे रविंद्र जडेजाने म्हटले. तसेच, भारतीय संस्कृती आणि मुल्यांचा प्रचार-प्रसार करण्याचं काम आरएसएस करते, असेही जडेजाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
लांब पल्ला गाठायचा आहे.
रवींद्र जडेजाने ट्विटच्या माध्यमातून रिवाबा जडेजाचा एक फोटो शेअर केला आणि म्हटले होते, "हॅलो! आता तुला माझ्या परिचयाची गरज नाही. कारण आता तुझी स्वत:ची एक ओळख आहे. लांब पल्ला गाठायचा आहे. #mlagujarat #78NorthJamnagar." जड्डूची ही पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. पत्नी रिवाबा आमदार झाल्यामुळे आता तिला माझ्या परिचयाची गरज नसल्याचे रवींद्र जडेजाने म्हटले आहे.
जडेजाने राजकारणात येण्याचे दिले होते संकेत
पत्नी विधानसभेत पोहोचल्यानंतर रवींद्र जडेजा देखील लवकरात लवकर आपली राजकीय खेळी सुरू करू शकतो. पत्नी रिवाबा यांचा उमेदवारी अर्ज भरताना पत्रकारांशी बोलताना खुद्द रवींद्र जडेजाने राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. मला अजून 4 ते 5 वर्षे क्रिकेट खेळायचे आहे, त्यानंतर मी राजकारणातही उतरेन, असे जडेजा म्हणाला होता. रिवाबा यांची ही निवडणूक फार चर्चेत आली होती कारण त्यांना कुटुंबातीलच विरोधाचा सामना करावा लागला. पती रवींद्र जडेजा त्यांच्यासोबत निश्चितच होता, पण वहिणी नयना स्वत: या जागेवरून काँग्रेसचे तिकीट मागत होत्या. सासरे आणि वहिनी दोघेही त्यांच्या विरोधात प्रचार करत होते. मात्र अखेर रिवाबा यांनी आमदार होण्याचा मान मिळवला.