जड्डूची पत्नी आमदार तर बहिणीची वाढली ताकद; २०२४ ला रंगणार वहिनी vs नणंद 'सामना'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 04:19 PM2023-06-09T16:19:17+5:302023-06-09T16:19:44+5:30
भारतीय संघाचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ही गुजरातच्या जामनगर येथून आमदार आहे.
नवी दिल्ली : भारतीय संघाचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ही गुजरातच्या जामनगर येथून आमदार आहे. मागील वर्षी पार पडलेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत ती भाजपच्या तिकिटावर निवडून आली. निवडणुकीच्या रणधुमाळीत जडेजा कुटुंबात राजकीय कलह पाहायला मिळाला होता. असाच संघर्ष आगामी निवडणुकीत दिसण्याची चिन्हं आहेत. कारण जड्डूची बहीण नयनाबा जडेजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
दरम्यान, कॉंग्रेस पक्षाने नयनाबा जडेजा हिच्यावर एक नवीन जबाबदारी सोपवली असून तिला राजकोट शहर आणि जिल्हा सेवा दलाचे प्रमुख बनवले आहे. नवी जबाबदारी मिळाल्यावर पुन्हा एकदा नव्याने काँग्रेस संघटन मजबूत करण्यासाठी परिश्रम घेणार असल्याचे नयनाबाने सांगितले. नयनाबाने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये सेवा दलाचे मुख्य संघटक लालजी देसाई यांचेही आभार मानले आहेत.
नणंदेचा पराभव करून रिवाबाने मिळवला विजय
नयनाबा हिच्यावर मोठी जबाबदारी देऊन काँग्रेसने तिचा मान वाढवला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपमधून आमदार झालेली रिवाबा जडेजा भाजपचा प्रचार करणार, तर तिची नणंद नयनाबा पुन्हा एकदा काँग्रेसचा प्रचार करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत वहिनी आणि नणंद यांच्यात राजकीय सामना रंगला होता. पण क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा प्रचंड मताधिक्याने विजयी झाली होती.
जडेजाच्या घरातच 'कॉंग्रेस vs भाजप'
रवींद्र जडेजाची बहीण नयनाबा जडेजा मागील मोठ्या कालावधीपासून कॉंग्रेसमध्ये सक्रिय आहे. तिने या आधी देखील संघटन मजबुतीसाठी विविध पदांवर काम केले. आता ती जिल्हा महिला अध्यक्ष राजकोट महिला सेवा दलाची जबाबदारी सांभाळणार आहे. राजकोटच्या राजकारणात ती खूप सक्रिय आहे. काँग्रेस सेवादलाचे मुख्य संघटक लालजी देसाई यांनी ही नवीन जबाबदारी नयनाबाला दिली आहे. गुजरात प्रदेश महिला सेवा दलाच्या प्रमुख प्रगती बेन अहिर यांनी नियुक्ती झाल्यानंतर नयनाबाचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यानंतर संपूर्ण राजकोटमध्ये संघटना मजबूत करण्याचे काम करणार असल्याचे नयनाबाने सांगितले.