- नितीन अग्रवालनवी दिल्ली : महाराष्ट्रातील गोदावरी, कृष्णा, पंचगंगा, तापी आणि मुळा-मुठा या पाच नद्या प्रदूषणापासून वाचविण्यासाठी ११८२.८६ कोटींची योजना तयार करण्यात आली आहे.
जलशक्ती राज्यमंत्री विश्वेश्वर टुडू यांनी राज्यसभेत सांगितले की, यात केंद्र सरकारचा वाटा २०९ कोटी रुपयांचा आहे. या योजनेतून दररोज २६० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी सयंत्रे कऱ्हाड, सांगली, कोल्हापूर, नांदेड, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि प्रकाशा येथे उभारण्यात आली आहेत.एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात त्यांनी सांगितले की, या नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक साहाय्य देत राज्यांना प्रोत्साहित केले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या फौजिया खान यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, नद्यांची स्वच्छता आणि संवर्धन ही निरंतर प्रक्रिया आहे. तथापि, ही प्रक्रिया नैसर्गिक कारणांवर अवलंबून असते. नद्यांतील प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी आणि कारखान्यातून निघणाऱ्या घाण पाण्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी राज्य सरकार आणि स्थानिक संस्थांची आहे.