"रिया चक्रवर्ती बंगाली ब्राह्मण महिला, तिला झालेली अटक भयावह" काँग्रेसनेही घेतली वादात उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 11:55 AM2020-09-11T11:55:13+5:302020-09-11T12:16:07+5:30
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवरून बिहारमध्ये आणि कंगनावरील कारवाईनंतर हिमाचल प्रदेशमध्ये राजकारणास सुरुवात झाली असतानाच आता काँग्रेसने रिया चक्रवर्तीवर झालेल्या कारवाईला निवडणुकीचा मुद्दा बनवण्याची तयारी सुरू केली आहे.
कोलकाता - सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून पेटलेल्या वादाने गेल्या तीन महिन्यांमध्ये रोज नवनवी वळणे घेतली आहेत. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवरून बिहारमध्ये आणि कंगनावरील कारवाईनंतर हिमाचल प्रदेशमध्ये राजकारणास सुरुवात झाली असतानाच आता काँग्रेसने रिया चक्रवर्तीवर झालेल्या कारवाईला निवडणुकीचा मुद्दा बनवण्याची तयारी सुरू केली आहे. रिया चक्रवर्ती ही बंगाली ब्राह्मण महिला असल्याचे सांगत काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. तसेच सुशांतला न्याय म्हणजे बिहारला न्याय अशी व्याख्या करता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने अधीररंजन चौधरी यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर चौधरी यांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यादरम्यान त्यांनी रिया चक्रवर्ती ही बंगाली ब्राह्मण महिला असल्याचे सांगितले. तसेच रियाचे वडील हे लष्करामधून निवृत्त झालेले अधिकारी असून, त्यांनी अनेक वर्षे देशाची सेवा केला. मात्र आज ते आपल्या दोन मुलांना न्याय मिळवून देऊ शकत नाही आहेत, अशी खंत अधीररंजन चौधरी यांनी व्यक्त केली.
तसेच रिया चक्रवर्तीला झालेली अटक ही भयावह घटना असल्याचेही ते म्हणाले. रिया चक्रवर्तीने कुणालाही आत्महत्या किंवा हत्येसाठी भाग पाडले नसल्याचे, तसेच तिने कुठलाही आर्थिक गुन्हा केला नसल्याचा दावाही ररंजन चौधरी यांनी केला आहे. रियाला एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. ही कारवाई केवळ आपल्या राजकीय नेतृत्वाला खूश करण्यासाठी करण्यात आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी आपली भूमिका निभावून नेली आहे. मात्र या समुद्र मंथनातून त्यांनी अमृताऐवजी अंमली पदार्थांचा शोध लावला आहे, असा टोला अधीररंजन चौधरी यांनी लगावला.
"निवडणुकीच्या फायद्यासाठी स्टार सुशांतसिंहला भाजपाने केलं 'बिहारी अभिनेता'
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असून नवनवीन माहिती समोर येत आहे. बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी उपयोग करून घ्यायची चलाख खेळी भाजपाने केल्याचं दिसून येत आहे. त्यासाठी सुशांतसिंहची छायाचित्रे असलेले स्टीकर व मास्क भाजपाने तयार केले आहेत. यावरून काँग्रेसने भाजपावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
अधीर रंजन चौधरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपावर निशाणा साधला आहे. याबाबत एक ट्विट केलं आहे. "सुशांतसिंह राजपूत हा देशाचा अभिनेता होता. मात्र भाजपाने निवडणुकीत फायदा करून घेण्यासाठी त्याला बिहारी अभिनेता करून टाकलं" असं म्हटलं आहे. तसेच अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वडीलही आपल्या मुलांसाठी न्याय मागण्यास पात्र आहेत, सर्वांसाठी न्याय हे आपल्या राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वांपैकी एक आहे.
बिहारमध्ये ना भुले है! ना भुलने देंगे! असं लिहिलेले स्टीकर्स
भाजपाच्या कला-संस्कृती विभागाच्या पाटणा शाखेने अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची छायाचित्रे असलेले 30 हजार स्टीकर व मास्क तयार केले आहेत. सुशांतसिंहच्या छायाचित्राखाली ना भुले है! ना भुलने देंगे! अशी घोषणा लिहिलेले स्टीकर बिहारमध्ये काही ठिकाणी झळकत आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून ती २९ नोव्हेंबरच्या आधी व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने पूर्वतयारी सुरू केली आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास हा विषय आता राष्ट्रीय पातळीवरही गाजत आहे व राजकारणाचा विषय झाला आहे. या तपासाच्या मुद्यावरून बिहार विरुद्ध महाराष्ट्रातील सरकार असाही संघर्ष झाला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी