आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी निकाल जाहीर होण्याआधीच केंद्रात इंडिया आघाडी सरकार स्थापन होईल असा मोठा दावा केला आहे. तसेच त्यांनी मोदींवर देखील निशाणा साधला आहे. "मोदी आता गेले. बिहारसह संपूर्ण देशात इंडिया आघाडीची लाट आहे. आम्ही जनतेमध्ये दिसणार आहोत" असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.
"पंतप्रधान मोदी घाबरले आहेत. पराभव होईल. मोदी पळत-पळत बिहारला येत आहेत. आता गावोगावी जातील" असंही ते म्हणाले. यासोबतच तेजस्वी यादव यांचं नाव न घेता मोदी म्हणाले होते की, हेलिकॉप्टरमध्ये चक्कर मारण्याची वेळ पूर्ण होताच जेलमध्ये जाण्याचा मार्ग निश्चित केला जाईल, यावर लालू प्रसाद यांनी प्रतिक्रिया देत मोदींना स्वतःलाच जेलमध्ये जावं लागेल असं म्हटलं आहे.
"मोदी स्वत:ला अवतार म्हणत आहेत. 4 जून रोजी इंडिया आघाडी सरकार स्थापन होणार आहे. ज्या दिवशी निकाल लागेल तेव्हा कळेल" असंही म्हटलं आहे. लालू प्रसाद यादव हे पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी उतरले आहेत. ते त्यांची मुलगी मीसा भारती यांच्यासाठी मतं मागत आहेत. एक जून रोजी मतदान होणार आहे.
लालू प्रसाद यादव यांनी मंगळवारी फुलवारी शरीफ येथील इमारत-ए-शरिया, खानकाह मुजिबिया येथे जाऊन लोकांची भेट घेतली. अब्दुल बारी सिद्दीकी हेही त्यांच्यासोबत होते. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी ते पुन्हा एकदा सक्रिय झालेले दिसत आहेत. याआधी ते रोहिणी आचार्य यांच्या निवडणूक प्रचारात सक्रिय दिसले होते.