बिहारचे माजी मुख्यमंत्री आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव मुंबईतील रुग्णालयात दाखल झाले आहेत, त्यांच्यावर आज बुधवारी अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. हृदयविकाराच्या समस्येमुळे अँजिओप्लास्टी करण्यात आली. ७६ वर्षीय लालू प्रसाद यादव यांना दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले होते. ब्लॉकेजमुळे डॉक्टरांनी अँजिओप्लास्टीचा सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे.
अँजिओप्लास्टीनंतर लालू प्रसाद यादव यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. एक-दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमधील डॉक्टरांनी त्यांची अँजिओप्लास्टी यशस्वी झाल्याची माहिती दिली. लालू प्रसाद यादव गेल्या मंगळवारी पाटणाहून मुंबईत पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, ते नियमित आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांना भेटणार आहेत.
लालू प्रसाद यादव यांचे १० वर्षांपूर्वी याच रुग्णालयात हृदयाचे ऑपरेशन झाले होते. ही शस्त्रक्रिया सुमारे ६ तास चालली होती. यानंतर लालू प्रसाद यादव २०१८ आणि २०२३ मध्ये चेकअपसाठी दोनदा मुंबईला आले होते.
लालू प्रसाद यादव गेल्या काही वर्षांपासून आजाराने त्रस्त आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये सिंगापूरमध्ये किडनी प्रत्यारोपण करण्यात आली. त्यानंतर ते अनेक महिने घरीच आराम करत आहेत.