NDA Vs INDIA: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी NDA आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. भाजपविरोधी पक्षांनी आपल्या नव्या आघाडीला INDIA असे नाव दिले आहे. विरोधकांना चितपट करत शक्तिप्रदर्शन करण्यासाठी NDA नेही कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांचा पराभव करणार असल्याचा विश्वास विरोधक व्यक्त करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विरोधकांच्या INDIA आघाडीवर टीका केली. स्वतंत्र्यलढ्याच्या चळवळीला जेव्हा चांगलीच गती मिळाली होती, तेव्हा महात्मा गांधी यांनी ‘क्विट इंडिया’ म्हणजेच भारत छोडोची घोषणा दिली होती. या घोषणेमुळे देशातील लोकांना प्रेरणा मिळाली होती. देशाच्या कल्याणासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी या घोषणेची आता पुन्हा एकदा गरज आहे. या घोषणेला गावकुसापर्यंत घेऊन जाण्याची गरज आहे. इंग्रजांनो भारत सोडून जा, असे महात्मा गांधी तेव्हा म्हणाले होते. अशाच प्रकारे आजदेखील भ्रष्टाचार क्विट इंडिया, घराणेशाही क्विट इंडिया, अशी घोषणा देण्याची गरज आहे. क्विट इंडियाच भारताला वाचवू शकेल. विरोधकांच्या ‘इंडिया’ नावाने समोर आलेल्या आघाडीला पराभूत करण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. याला आता राजद पक्षाचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
PM मोदी कायमचे परदेशात निघून जातील
नरेंद्र मोदी यांना २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पराभूत होण्याची भीती आहे. या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर तेच भारताच्या बाहेर जाऊन वास्तव्य करणार आहेत. नरेंद्र मोदी भारत सोडून जाण्याचा विचार करत आहेत. याच कारणामुळे ते अनेक देशांच्या भेटी घेत आहेत. पिझ्झा, मोमोज यासारख्या पदार्थांचा मनमुराद आनंद लुटता यावा, असे ठिकाण ते राहण्यासाठी शोधत आहेत, असा खोचक टोला लालू प्रसाद यादव यांनी लगावला.
दरम्यान, मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडीची महत्त्वाची तिसरी बैठक होणार आहे. या बैठकीची वाट पाहात असून, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह मुंबईतील बैठकीला येणार असल्याचे लालू प्रसाद यादव यांनी सांगितले. नरेंद्र मोदी संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आम्ही हा प्रयत्न हाणून पाडू. एकजूट कायम ठेवत भाजपचा पराभव केला पाहिजे, असे आवाहन लालू प्रसाद यादव यांनी केले.