नवी दिल्ली: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीत विरोधी पक्षांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला लालूप्रसाद यादव यांचे पूत्र आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव उपस्थित राहणार आहेत. येत्या 13 तारखेला हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी राजदची साथ सोडून भाजसोबत हातमिळवणी केल्यापासून लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांमागे बेहिशेबी संपत्तीप्रकरणी अनेक चौकश्यांचा ससेमिरा मागे लागला आहे. काही दिवसांपूर्वीच अनेक वर्ष जुन्या चारा घोटाळ्याच्या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना सीबीआयने न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यानंतर लालू प्रसाद यादव यांची रवानगी तुरूंगात झाली होती. याशिवाय, त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांचीही वेगवेगळ्य़ा प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्याचे ऐकून त्यांची बहीण गंगोत्री देवी यांना जबर धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सध्या यादव कुटुंबीयांची चांगलीच कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर 13 मार्चला सोनिया गांधी आणि तेजस्वी यांच्यात काय चर्चा होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात आघाडी करण्यासाठी सोनिया गांधी यांनी सर्व विरोधी पक्ष नेत्यांना १३ मार्च रोजी रात्री भोजनासाठी निमंत्रित केले आहे. काँग्रेस अधिवेशनाआधी हे भोजन होणार आहे. आतापर्यंत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) असलेल्या पक्षांनाही त्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यात तेलगू देसम पक्ष (टीडीपी) व तेलंगण राष्ट्र समितीचा (टीएसआर) समावेश आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका पाहता सोनिया गांधी यांचा पुढाकार महत्त्वाचा आहे.या बैठकीत मोदी सरकारविरोधात संसदेत व बाहेर भूमिका घेण्याविषयी चर्चा अपेक्षित आहे. टीडीपीला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी जंतरमंतरला गेले व त्यांनी आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. काँग्रेसला सत्ता मिळाली तर आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले. त्यामुळे या भोजनाला टीडीपी नेते जातील, असे दिसते.तृणमुलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही तिथे यावे, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी बॅनर्जी यांच्याशी स्वत: सोनिया संपर्क साधणार असल्याची चर्चा होती.