नवी दिल्ली - बिहारमधील माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या सरकारी बंगल्याच्या नुतनीकरणावरून आता आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. बिहार सरकारमधील बांधकाम विभागाचे प्रधान सचिव चंचल कुमार यांच्या बंगल्याच्या नुतनीकरणावर अधिक खर्च केला नसल्याच्या दाव्यानंतर विद्यमान उपमुख्यमंत्री आणि भाजपनेते सुशीलकुमार मोदी यांनी तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली.
तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यासाठी शाही व्यवस्था केली गेली होती, असा आरोप मोदी यांनी केला. तसेच कोणत्या नियमानुसार तेजस्वी यादव यांच्या ५ देशरत्न मार्गावरील बंगल्यात ब्रिज कन्स्ट्रकशन कॉर्पोरेशनच्या वतीने ५९ लाख रुपयांचे फर्निचर लावण्यात आले होते. या व्यतिरिक्त बीसीडीकडून नुतनीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च कसकाय करण्यात आले, असा सवालही त्यांनी विचारला.
मोदी पुढे म्हणाले की, तेजस्वी यादव यांच्या सरकारी बंगल्यात ४४ एसी बसविण्यात आले होते. त्यापैकी काही एसी बाथरूममध्ये देखील लावण्यात आले होते. ३५ महागडे लेदरचे सोफासेट, ४६४ फॅन्सी एलईडी लाईट, १०८ पंखे, बिलबोर्ड टेबल, भितींना वुडन पॅनल, वूडन फ्लोर आणि परदेशी ग्रेनाईट कोणत्या नियामानुसार लावले होते, असा प्रश्न सुशील मोदी यांनी उपस्थित केला.
दरम्यान तेजस्वी यादव यांनी पदाचा दुरुपयोग आणि अवास्तव खर्च केला नसता तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ५० हजारांचा दंड लावून बंगला खाली करण्यास भाग पाडले नसते, असंही मोदी म्हणाले.