पाटणा - मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उत्तर सभेनंतर राज्यातील वातावरण तापलं असून मिशदींवरील भोंग्याचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यातच, राज ठाकरेंनी 1 मे रोजी आणखी एका जाहीर सभेची घोषणा केली असून 5 जून रोजी अयोध्या दौरा करत असल्याचेही सांगितले. त्यामुळे, मशिदींवरील भोंग्यासंदर्भात राज्य सरकारने पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. यावरुन, राज ठाकरेंवर अनेकांनी टिका केली आहे. त्यातच, राष्ट्रीय जनता दलाने ट्विट करुन मनसेवर उपहासात्मक टिका केली आहे.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात 3 मेपर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. माझा मुद्दा हा धार्मिक नसून सामाजिक असल्याचे त्यांनी म्हटले. त्यातच, देशातील हिंदू बांधवांना आवाहनही केलं आहे. त्यामुळे, राजकीय वर्तुळात राज ठाकरे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. मात्र, अनेकांनी राज यांच्यावर टिकाही केली आहे. राज ठाकरेंच्या आवाहनावर लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानेही प्रतिक्रिया दिली आहे.
''ज्याप्रमाणे नमाज 5 वेळा तोंडाने म्हटली जाते, त्याचप्रमाणे हनुमान चालिसाही तोंडानेच म्हणायला हवी. कॅसेट वाजवून हनुमान चालिसा नको, असं झाल्यास आम्ही त्यास चिटींग समजू,'' असे राष्ट्रीय जनता दलाने म्हटले आहे.
राज ठाकरेंना सुरक्षा देण्याची शक्यता
राज ठाकरेंना आता केंद्र सरकार सुरक्षा देण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेने धमकी दिली होती. त्यामुळे केंद्र सरकारकडून आता राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा काल पुण्यातील पत्रकार परिषदेत केली आहे. त्यांना या दौऱ्यात उत्तर प्रदेश सरकार विशेष सुरक्षा पुरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.