नवी दिल्ली: नवी दिल्लीत रविवारी राष्ट्रीय जनता दलाचे(RJD) राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. या राष्ट्रीय अधिवेशनात मोठा गदारोळ झाला. आरजेडी नेते तेज प्रताप यादव सभेतून बाहेर पडले. त्यांनी श्याम रजक यांच्यावर बहिणीला शिवीगाळ केल्याचा आरोप केला. तसेच, श्याम रजक यांना RSSचे एजंट म्हटले.
लालू यादव यांचा मोठा मुलगा आणि बिहारचे वन आणि पर्यावरण मंत्री तेज प्रताप यादव हेही या बैठकीला उपस्थित होते. मात्र काही वेळाने तेज प्रताप यादव बैठक सोडून बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत होता. यावेळी त्यांनी आपल्याच पक्षाचे नेते श्याम रजक यांच्यावर मोठा आरोप केला. तेज प्रताप म्हणाले की, श्याम रजकने माझ्या बहिणीला शिव्या दिल्या. माझ्याकडे त्याचा ऑडिओ आहे. मी हा ऑडिओ माझ्या सोशल मीडिया पेजवरून शेअर करेन.
तेज प्रताप यादव यांनी सांगितले की, आम्ही श्याम रजक यांना कार्यक्रमाबाबत विचारले असता त्यांनी अश्लील शिवीगाळ केली. माझ्या बहिणीला आणि पीएलाही शिव्या दिल्या. आम्ही त्याचा ऑडिओ बिहारच्या लोकांना ऐकवू. श्याम रजक हे आरएसएस आणि भाजपचे एजंट असल्याचा आरोपही तेज प्रताप यांनी केला. अशा भाजप-आरएसएसच्या लोकांना संघटनेतून हाकलले पाहिजे, असेही ते म्हणाले.
श्याम रजक काय म्हणाले?या प्रकरणी श्याम रजक यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, मला या विषयावर भाष्य करण्याची गरज नाही. तेज प्रताप यांना जे म्हणायचे आहे ते बोलत आहेत. तो सामर्थ्यवान आहे आणि मी एक दलित व्यक्ती आहे. याशिवाय मी काहीही बोलू शकत नाही.