Panchayat Web Series in Parliament: संसदेच्या पावसाळी अधिवशेनात सध्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान आरजेडीचे खासदार मनोज कुमार झा यांनी पंचायत या वेबसिरीजचे उदाहरण देऊन निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. आरजेडीचे खासदार मनोज झा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या तक्रारी आणि सर्वेक्षण अहवालाचा उल्लेख केला. निवडणूक आयोग लोकांचा विश्वास गमावत चालला असल्याचे मनोज झा यांनी म्हटलं.
सोमवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु होती. त्यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे राज्यसभा खासदार प्राध्यापक मनोज कुमार झा यांनी आपल्या भाषणादरम्यान पंचायत वेब सीरिजचा उल्लेख केला आणि निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. खासदार मनोज झा यांनी एका अहवालाचा उल्लेख करत निवडणूक आयोगावर केवळ २८ टक्के लोकांनाच विश्वास असल्याचे म्हटलं. लोकांचा त्यापेक्षा जास्त विश्वास हा पंचायतमधल्या सरपंचावर असल्याचे मनोज झा यांनी म्हटलं . पंचायत ही एक प्रसिद्ध वेब सिरीज आहे ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते रघुबीर यादव यांनी सरपंचाची भूमिका साकारली आहे.
मनोज झा यांनी आणीबाणीवरुन आपलं मत मांडले. "सध्या आणीबाणीची खूप चर्चा होत आहे. खरच परिस्थिती खूप वाईट होती. पण इंदिरा गांधींचे सल्लागार हुशार नव्हते असे मला म्हणायचे आहे. इंदिराजींचे सल्लागार हुशार असते तर त्यांनी असेच होईल असे सांगितले असते. ३५२ वापरायची गरज लागली नसती. या आदेशात सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही संदेश आहे. त्यांच्यासाठी संदेश असा आहे की व्यक्तिकेंद्रित प्रवचनाला मर्यादा आहेत. तर आमच्यासाठी संदेश हा आहे की आम्ही केलेले प्रयत्न पुरेसे नव्हते," असे मनोज झा म्हणाले.
"संपूर्ण निवडणूक काळात बिहारमध्ये होतो. आमच्या जागा कमी झाल्या असतील पण आम्ही बिहारची दिशा बदलली. निवडणुकीच्या वेळी अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या. मंगळसूत्र, नळ काढून नेले जातील या सगळ्या गोष्टी ऐकल्या. त्याचवेळी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती, मात्र आम्हाला दोन दिवसांपूर्वीच मेल आला आहे. त्यात आमचा फोन नंबर आणि नाव विचारण्यात आले आहे. एक सर्वेक्षण करण्यात आले ज्यामध्ये केवळ २८ टक्के लोकांनी निवडणूक आयोगावर विश्वास असल्याचे सांगितले. यापेक्षाही पंचायत वेब सीरिजमधल्या फुलेरा गावच्या सरपंचावर लोकांचा अधिक विश्वास आहे," असे मनोज झा म्हणाले.