नवी दिल्ली: तब्बल ५०० वर्षांची प्रतीक्षा संपली असून अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्री राम विराजमान झाले आहेत. विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थित सोमवारी रामललाचा अभिषेक सोहळा पार पडला. बॉलिवूडमधील कलाकार, उद्योजक, महंत, खेळाडू आणि राजकीय मंडळी यांची या कार्यक्रमासाठी लक्षणीय उपस्थिती होती. विरोधी पक्षांमधील नेत्यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. मात्र अनेकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. यावरून राजकारण देखील तापले असून बिहारचे मंत्री तेजप्रताप यादव यांनी भाजपाला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.
बिहार सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव तेजप्रताप यादव हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याबद्दल त्यांनी अलीकडेच एक विधान केले होते की, प्रभू श्री राम त्यांच्या स्वप्नात आले होते आणि त्यांनी अयोध्येत येणार नसल्याचे सांगितले होते.
भाजपाला खोचक टोलादरम्यान, आता पुन्हा एकदा तेजप्रताप यांनी एक पोस्ट करून भाजपाला खोचक टोला लगावला आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले, "रामलला आले नाहीत, निवडणुका आल्या आहेत. आमच्या मनात, हृदयात आणि प्रत्येक कणात श्री राम आधीच विराजमान आहेत. सनातन धर्माच्या मान्यतेनुसार, प्रभू श्री राम हे भगवान विष्णूचा अवतार आहेत आणि भगवान विष्णूचा शेवटचा अलतार 'कल्की अवतार' याला कलियुगाच्या समाप्तीनंतर धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी परत येणे बाकी आहे. सियावर रामचंद्र की जय."
भाजपावर हल्लाबोलखरं तर या पोस्टद्वारे तेजप्रताप यादव यांनी आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीकडे लक्ष वेधले आहे. नाव न घेता त्यांनी एकप्रकारे भाजपावर हल्लाबोल केला आहे. राम मंदिरावरून विरोधी पक्षातील नेते थेट भाजपाला लक्ष्य करत आहेत. राम मंदिर हा भाजपाने निवडणुकीसाठी बनवलेला मुद्दा असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. त्यावरून राजकारण सुरू आहे.