पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात रंगत आली असून राजकीय पक्षांकडून घोषणांचा पाऊस पडत आहेत. भाजपा, जयदूने आपल्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा केल्यानंतर आता लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानेही मोठ्या घोषणा करत, पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. राजद नेते तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन, पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. 'प्रण हमारा संकल्प बदलाव का' असे नाव देण्यात आले आहे. या जाहीरनाम्यातही युवकांना केंद्र स्थानी ठेवण्यात आले आहे.
राजदच्या जाहीरनाम्यात 17 मुद्द्यांना स्थान देण्यात आले असून 10 लाख युवकांना नोकरी देण्याचा संकल्प तेजस्वी यादव यांच्या पक्षाने मांडला आहे. त्यासोबतच, शेती, शिक्षण याही मुद्द्यांना स्थान देण्यात आलंय. राजदच्या 16 पानी जाहीरनाम्यात सत्ता आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये 10 लाख युवकांना नोकरीसंदर्भात प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे म्हटले आहे. यावेळी, भाजपाच्या जाहीरनाम्यावरही यादव यांनी टीकास्त्र सोडले. एनडीएतील भाजपा नेते 10 लाख युवकांना नोकरी देणार असल्याचे सांगतात, पण जयदूने हात वर केले आहेत. विशेष म्हणजे भाजपाचे नेतेच युवकांना पकोडे तळण्याचा आणि गटार सफाईचा मार्ग दाखवत असल्याचे म्हटले.
राजदच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे
नवीन स्थायी स्वरुपातील पदांच्या निर्मित्तीद्वारे 10 लाख नोकरीची प्रक्रिया पहिल्याच कॅबिनेट बैठकीत मंजूर करुन कामाला गती देण्यात येईल.
कंत्राटी पद्धतीला बंद करुन सर्वच कर्मचाऱ्यांना कायम करुन समान काम, समान दाम देण्यात येईल, सर्वच विभागातील खासगीकरणही बंद करण्यात येईल.
नवीन उद्योजकांना अनुदान देऊन राज्यात उद्योगधंदे वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, तसेच नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येईल.
कार्यालय सहायक, संख्याकी स्वय सेवक, लायब्रेरियन, उर्दू शिक्षक, आंगणवाडी सेविका आणि सहायक, आशा वर्कर, ग्रामीण आरोग्य दूत यांच्या मागण्या मान्य करणार.
आरोग्य केअर सेंटर मे खासगी आणि असंघटीत क्षेत्राच्या माध्यमातून लाखो नोकऱ्यांची निर्मित्ती करण्यावर भर
प्रत्येक जिल्ह्यात रोजगार निर्मित्ती केंद्राची स्थापन करण्यात येईल, 200 दिवसांत कौशल्य विकास योजनेतून नोकरी देण्याचं आश्वासन
रोजगार प्रक्रियेत मध्यस्थी किंवा दलालांना हटवून युवकांना थेट नोकरीचा लाभ देण्यात येईल.
भाजपाकडून मोफत लसीची घोषणा
भाजपाने गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा घोषित केला असून यात मुख्य म्हणजे कोरोनाचा महामारीचाही उल्लेख करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पाटण्यात भाजपाने संकल्प पत्र प्रसिद्ध केलं आहे. भाजपाच्या जाहीरनाम्यात भाजपाने ११ मोठे संकल्प केले आणि सत्तेत आल्यानंतर अनेक आश्वासने पूर्ण करण्याचा दावा केला. “भाजपा है तो भरोसा है’ ५ सूत्रे, एक लक्ष्य, ११ संकल्प' यासह भाजपाने नवीन नाराही दिला आहे. कोरोनाची ही लस बिहारच्या लोकांना मोफत दिली जाईल असं आश्वासन भाजपानं आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे. यावरुन इतर राज्यातील नेत्यांनी भाजपाला लक्ष्य केलंय. तसेच, नागरिकांनाही नाराजी वर्तवली आहे.
जयदूचाही जाहीरनामा प्रसिद्ध
भाजपानंतर, जनता दल युनायटेडनेही प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायणसिंह, कार्यकारी प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी यांच्यासमवेत इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला. जनता दल युनायटेडने आपल्या जाहीरनाम्यात 7 सुत्री कार्यक्रम 2 ची घोषणा केली आहे. त्यामध्ये तरुणाईवर भर देण्यात आला असून रोजगार निर्मित्तीला प्राधान्य देण्यात येणार आहे. जदयूच्या जाहीरनाम्यातील 7 महत्त्वाच्या घोषणांमध्ये, आर्थिक हल युवाओं को बल हा एक नारा आहे. तर, युवा शक्ति बिहार की प्रगती हा दुसरा नारा आहे. आरक्षित रोजगार महिलाओं को रोजगार, हर घर बिजली, हर खेत के लिए सिंचाई... याही घोषणा करण्यात आल्या आहेत. हर घऱ नल का स्वच्छ गांव, समृद्ध गांव... तसेच घर तक पक्की गली नालियाँ, विकसित शहर... अशीही घोषणा आहे.