चेन्नई - वादविवादांमुळे गाजलेल्या आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या आर.के. नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीमध्ये टी.टी.व्ही. दिनकरन यांनी दणदणीत विजय मिळवला. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिनकरन हे शशिकला यांचे पुतणे आहेत.दरम्यान, मतमोजणीत मोठी आघाडी घेतल्यानंतर दिनकरन यांना आपणच अम्मांचे खरे वारस असून, तामिळनाडूमधील सरकार पुढच्या तीन महिन्यांत कोसळेल, असा दावा केला होता. झालेल्या एकूण 1 लाख 96 हजार 889 मतदानापैकी दिनकरन यांना 89 हजार 13 मते मिळाली. त्यांनी एकूण 40 हजार 707 मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले अण्णा द्रमुकचे उमेदवार ई. मधुसुधनान यांना 48 हजार 306 मते मिळाली, तर द्रमुकच्या मारुदू गणेश यांना 24 हजार 651 मते मिळाली. भाजपाचे कारू नागराजन यांना 1417 मते मिळाली.
दरम्याान, मतमोजणीमध्ये सकाळीच मोठी आघाडी घेतल्यानंतर दिनकरन म्हणाले होते की, आर.के. नगर मतदारसंघातून अम्मा निवडणूक लढत असत. या पोटनिवडणुकीमध्ये मतदारांनी दिलेल्या कौलाचा विचार केला तर एआयएडीएमके आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हाचे भविष्य काय आहे, हे निश्चित झाले आहे. मी आर.के. नगर मतदारसंघातील जनता आणि पक्षाच्या समर्थकांचे आभार मानतो. आर.के. नगर मतदारसंघातील मतमोजणीमध्ये सहाव्या फेरीअखेर टी. टी. व्ही. दिनकरन यांनी मोठी आघाडी घेतली होती, तेव्हापासून त्यांच्या विजय निश्चित मानण्यात येत होता.
आर.के.नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. दरम्यान, या पोटनिवडणुकीत दिनकरन यांची सरशी झाल्याने अण्णा द्रमुक पक्षातील बंडाळी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच दिनकरन यांचा विजय हा पलानीस्वामी आणि पनिरसेल्वम यांच्यासाठी धक्का मानण्यात येत आहे.