नवी दिल्ली - राष्ट्रीय लोक दल (RLD) ने उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कॅबिनेट मंत्री बेबी राणी मौर्य (Cabinet Minister Baby Rani Maurya) यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांच्यावर कर्मचार्यांकडून बुटांचं डिस्पोजेबल कव्हर काढण्याचा आरोप करण्यात आला आहे. आरएलडीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "सत्तेच्या नशेत असलेल्या बेबी राणी मौर्य यांच्याकडे पाहा, त्यांनी कर्मचाऱ्याकडून स्वतःच्या बुटांचं डिस्पोजेबल कव्हर काढून घेतलं" असं म्हटलं आहे.
RLD ने "बेबी राणी मौर्यचे थाट पाहा सत्तेच्या नशेत असलेल्या मॅडम, उन्नावमधील पोषण उत्पादन युनिटची तपासणी केल्यानंतर, तिथल्या कर्मचाऱ्याकडून स्वतःच्या बुटांचे डिस्पोजेबल कव्हर्स काढून घेत आहेत" असं म्हटलं आहे. बेबी राणी मौर्य शुक्रवारी उन्नावच्या बिघापूर ब्लॉकच्या घाटमपूर गावात अन्न प्रसन्न प्रेरणा महिला लघु उद्योग पोषण युनिटमध्ये पोहोचल्या होत्या. येथे त्यांनी युनिटची पाहणी केली.
कॅबिनेट मंत्र्यांनी गरोदर महिला आणि कुपोषित बालकांसाठी तयार केलेल्या पोषण आहाराची गुणवत्ता तपासली. त्यावेळी येथे गहू सडत असल्याचे मंत्र्यांच्या लक्षात आले, त्यावर नाराजी व्यक्त करत जबाबदार अधिकाऱ्याकडून खुलासा मागवला आहे. दर्जेदार पोषण आहार देण्याच्या सक्त सूचना मंत्र्यांनी दिल्या.
सपानेही साधला निशाणा
समाजवादी पक्षानेही यावरून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सत्तेच्या नशेत राज्यकर्ते गर्विष्ठ झाले आहेत, असे सपाने ट्विटरवर लिहिलं आहे. उन्नावमधील अन्नुपूरक पोषण उत्पादन युनिटची पाहणी केल्यानंतर कॅबिनेट मंत्री बेबी राणी मौर्य यांनी त्यांच्या शूजचे डिस्पोजेबल कव्हर तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांकडून काढून घेतले. मंत्री महोदय, तुमच्या या कृत्याबद्दल तुम्ही माफी मागावी, असं सपाने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.