नवी दिल्ली - लोकसभा 2019 ची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तस तशी राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. प्रचारसभांमधून अनेक नेते एकमेकांवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रीय लोक दलाचे नेते अजित सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम महिलांसाठी तिहेरी तलाकविरोधात कायदाही आणला. मात्र, त्याच मोदींनी स्वत:च्या पत्नीला घटस्फोट (तलाक) न देताच सोडून दिले' अशी टीका अजित सिंह यांनी केली आहे. बागपत येथे बुधवारी (3 एप्रिल) एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी मोदींवर घणाघाती टीका केली आहे.
अजित सिंह यांनी 'पंतप्रधान मोदी खोटं बोलत नाहीत. परंतु समस्या हीच आहे की, ते आजपर्यंत कधीच खरे बोलले नाहीत. ते लहान मुलांना सतत खरं बोला, असा उपदेश करत असतात. मात्र, मोदींच्या आई-वडिलांनीच त्यांना खरे बोलायला शिकवले नाही. मोदी मुस्लिम महिलांच्या बाजूने उभे असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी तिहेरी तलाकविरोधी कायदाही मोदींनी आणला. मात्र, त्याच मोदींनी स्वत:च्या पत्नीला घटस्फोट (तलाक) न देताच सोडलं' असं म्हटलं आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एका प्रचारसभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह टिपण्णी केली आहे. चंद्राबाबूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खतरनाक दहशतवाद्याची उपमा दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कट्टर दहशतवादी संबोधलं आहे. मोदींनी चंद्राबाबूंची तुलना बाहुबली चित्रपटातील भल्लालदेवशी केली होती. त्याच टीकेला उत्तर देताना चंद्राबाबूंनी मोदींची कट्टर दहशतवाद्याची तुलना केली आहे. मदनापल्ले येथे एका रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले, मोदी एक खतरनाक दहशतवादी आहेत. ते योग्य व्यक्ती नाहीत. इथे माझे अल्पसंख्याक भाऊही उपस्थित आहेत. जर तुम्ही पुन्हा मोदींना मतदान केलं, तर तुमच्यासाठी अनेक समस्या उद्भवू शकतात. गोध्रा कांडवेळीसुद्धा 2 हजारांहून अधिक लोकांची हत्या करण्यात आली होती. मी तेव्हाच सांगितलं होतं की, मोदी देशासाठी घातक आहेत. म्हणून मी अशी पहिली व्यक्ती होतो, ज्यांनी मोदींची साथ सोडून एनडीएला सोडचिठ्ठी दिली.
नरेंद्र मोदी म्हणजे अडाणी आणि सडकछाप माणूस, माजिद मेमन यांची टीकाराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजिद मेमन यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मोदींचा उल्लेख अडाणी आणि सडकछाप माणूस असा केला होता. माजिद मेमम मोदींवर टीका करताना म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक अडाणी, सडकछाप माणसासारखे बोलतात, असे मला वाटते. ते एवढ्या मोठ्या पदावर बसले आहेत, त्यांचे पद घटनात्मक पद आहे. अशा पदासाठी रस्त्यावरून पंतप्रधान निवडला जात नाही. तसेच जनता थेट पंतप्रधानाची निवड करत नाही. तर जनतेकडून निवडलेले खासदार पंतप्रधानाची निवड करतात. यावेळीसुद्धा सर्वात मोठा पक्ष पंतप्रधानाची निवड करणार आहे.''
...तर मोदींविरोधात खुनाचे गुन्हे दाखल करेन; नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्याचं वादग्रस्त विधान नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते जावेद अहमद राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. मोदींना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे. 'मला शक्य झाले तर मी मोदींना जम्मू-काश्मीरमधील तरुणांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात टाकेन' असं राणा यांनी म्हटलं होतं. जावेद अहमद राणा यांनी 'अल्लाहची शपथ घेऊन सांगतो की जर मला शक्य असतं तर मी देशाच्या पंतप्रधानांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असता. जम्मू-काश्मीरमध्ये जितक्या हत्या झाल्या, त्या प्रकरणी आणि देशात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी मी मोदींविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकेन' असं म्हटलं होतं. बुधवारी (27 मार्च) पूँछ येथे जावेद अहमद राणा यांनी स्थानिकांशी संवाद साधत असताना असं वादग्रस्त विधान केलं.