लखनौ - देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या कैराना लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये भाजपाला जबरदस्त धक्का बसण्याची चिन्हे आहेत. येथील मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये राष्ट्रीय लोक दलाच्या उमेदवार तबस्सूम हसन यांनी मोठी आघाडी घेतली आहे. तर भाजपाच्या उमेदवार मृगांका सिंह या पिछाडीवर पडल्या आहेत. सुरुवातीच्या फेऱ्यामध्येच तबस्सूम हसन यांनी 65 हजारहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. भाजपा खासदार हुकूम सिंह यांच्या निधनामुळे कैराना लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला होता. येथील पोटनिवडणुकीसाठी भाजपाने हुकूम सिंह यांची कन्या मृगांका सिंह यांना उमेदवारी दिली होती. तर राष्ट्रीय लोकदल पक्षाने तबस्सूम हसन यांना मैदानात उतरवले होते. राष्ट्रीय लोक दलाच्या उमेदवाराला समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस यांनी पाठिंबा दिला होता.
कैरानामध्ये आरएलडीची मुसंडी, भाजपाला जबरदस्त धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 10:11 AM