नवी दिल्ली - गतवर्षांच्या अखेरीस राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजस्थानमधील पैकीच्या पैकी जागा जिंकणाऱ्या भाजपाच्या गोटात खळबळ उडाली होती. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असतानाच राजस्थानमध्ये भाजपाला तगडा सहकारी लाभला आहे. राजस्थानमधील मारवाड भागात प्रभाव असणाऱ्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे प्रमुख हनुमान बेनिवाल यांनी एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भाजपानेही त्यांना नागौर मतदारसंघातून उमेदवारी दिली असून, बेनिवाल यांचा एनडीएमधील प्रवेश हा काँग्रेससाठी धक्का असल्याचे म्हटले जात आहे. एनडीएमध्ये दाखल झालेले बेनिवाल म्हणाले की, ''आमच्यासाठी राष्ट्रहित सर्वोच्च आहे. भाजपाने नागौर मतदारसंघ आरएलपीसाठी सोडला आहे. आता राजस्थानमधील 24 जागांसोबतच हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये आरएलपीचे कार्यकर्ते मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी आपली शक्ती पणाला लावतील. सत्तेत असताना काँग्रेसने देशाला लुटण्याचे कामच केले आहे. आता राजस्थानमध्येही 25-0 असा निकाल लागेल.काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही.''
भाजपाला जिंकून देण्यासाठी राजस्थान; एनडीएमध्ये दाखल झाले 'हनुमान'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 4:00 PM