विशेष मुलाखत- पुष्कर धामी, मुख्यमंत्री उत्तराखंड
निवडणुकीच्या आधी पहिली चार वर्षे उत्तराखंडात भाजप ढिला पडला होता. आपण जादूची अशी कोणती कांडी फिरवलीत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने केवळ भारताचेच नव्हे तर जगातले सर्वात प्रभावी नेतृत्व आमच्याकडे आहे. त्यांची प्रेरणा आणि मार्गदर्शनाखाली राज्यात पुष्कळ कामे झाली. ज्यामुळे आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळाला, बहुमत मिळाले. रस्त्यांमुळे गावे जोडली गेली. रेल्वे आणि विमान सेवेने देशाच्या कानाकोपऱ्यात उत्तराखंडातून जाता येऊ लागले.
आपल्या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेले काही निर्णय आपण परत घेतले. आपल्या विजयाचे हे कारण मानावे काय?
काही कर्मचारी संघटना नाराज होत्या. त्यांच्याशी बोलून मधला रस्ता काढला गेला. देवस्थानम बोर्डाच्या बाबतीत समिती स्थापन केली गेली होती. त्या समितीने भाविक पंडा समाज, रावल आदींकडून मते घेऊन आपला अहवाल तयार केला होता. त्या अहवालाच्या आधारे बोर्ड भंग केले गेले. लोकांच्या भावनांना अनुरूप जे निर्णय घेणे जरुर होते ते घेतले गेले.
- पण आपण आपल्या मतदार संघात पराभूत झालात, स्वकीयांनी काही घातपात केला का? नाही. नाही. सर्वांचे सहकार्य मिळाले. कुठे काही कमी राहून गेले असेल तर ते दूर करू.
आपल्यासाठी दोन काँग्रेस आमदारांनी जागा रिकामी करून दिली हे कसे जमवले?
आमच्या पक्षातले लोक, सहकारी पक्ष आणि काही अपक्षांनीही जागा सोडायची तयारी दर्शवली होती. मी सर्वांचा आभारी आहे. मी चंपावत मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. ती देवभूमी आहे. येथे माँ पूर्णागिरीचे निवासस्थान आहे. शारदा मैयाचा किनारा आहे. बाबा गोरखनाथ, माँ वाराही, रंकूची मैय्या यांचे स्थान आहे. माँ हिंग्लाज देवीचे स्थान आहे. घटोत्कचाचे स्थान आहे. या सर्वांच्या आशीर्वादाने यावेळी मला जनतेचाही आशीर्वाद मिळेल, अशी आशा मी करतो.
आपल्या पहिल्या कार्यकाळापेक्षा यावेळी वेगळे काय करणार आहात?
पहिल्या कार्यकाळात मला खूप कमी वेळ मिळाला. कामे पुष्कळ होती. निवडणूक डोक्यावर होती. सर्वांच्या सहकार्याने आम्ही दोन तृतीयांश बहुमत मिळवले. आता आम्ही समान नागरिक संहितेचा कायदा करणारे देशाचे पहिले राज्य होण्याच्या दिशेने प्रयत्न करू. विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी समिती स्थापन केली गेली आहे. लवकरच ते विधानसभेत संमत करून घेतले जाईल.
केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारधाम यात्रेसाठी यावेळी कशी व्यवस्था करणार आहात?
कोरोनामुळे दोन वर्षांनंतर चारधाम यात्रा सुरू होत आहे. स्वाभाविकच भाविक अधिक संख्येने येत आहेत. पहिल्या वर्षाच्या तुलनेने कित्येक पटीने अधिक. या यात्रेचे चांगले व्यवस्थापन आमच्यासाठी एक आव्हानच असून, आम्ही ते निभावण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहोत. परंतु, यात्रेच्या काळात पर्यटकांचे मृत्यू होत असल्याच्या बातम्या येत आहेत. प्रत्येक वर्षी प्राकृतिक कारणांनी अनेक भाविक मृत्युमुखी पडतात. यावर्षी भाविकांची संख्या अधिक असल्याने मृत्यूची संख्या ही जास्त वाटणारच. वास्तवात ती जास्त नाही.
इतक्या संख्येने पर्यटक आल्यानंतर पर्यावरणाचे काय?
उत्तराखंडाची अर्थव्यवस्था पर्यटकांवर अवलंबून आहे. परंतु आमच्यासाठी इकॉनॉमी इतकीच इकॉलॉजीही महत्त्वाची आहे. आम्ही दोन्हींचा समतोल राखत आहोत.
बद्री आणि केदारनाथला जाण्यासाठी अधिक चांगला रस्ता आणि रेल्वे सेवा कधीपर्यंत निर्माण केली जाईल?
काही कायदेशीर अडचणींमुळे रस्त्याचे कामकाज थोडे थांबले. सर्व प्रकारच्या हवामानात चालू शकेल, असा रस्ता लवकरच तयार होईल.केदारनाथसाठी रेल्वे सेवा काही वर्षांतच सुरू होईल. जवळपास त्याच वेळी केदारनाथसाठी रोप-वेही चालू होऊ शकेल.