रस्ता १८ कोटींचा, खर्च केले २५० कोटी; कॅगच्या अहवालातून ७ प्रकल्पांमधील गैरव्यवहार समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 05:34 AM2023-08-18T05:34:48+5:302023-08-18T05:36:30+5:30

या सर्व गैरव्यवहारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. 

road worth 18 crores spent 250 crore cag report exposes malpractice in 7 projects | रस्ता १८ कोटींचा, खर्च केले २५० कोटी; कॅगच्या अहवालातून ७ प्रकल्पांमधील गैरव्यवहार समोर

रस्ता १८ कोटींचा, खर्च केले २५० कोटी; कॅगच्या अहवालातून ७ प्रकल्पांमधील गैरव्यवहार समोर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विविध सात पायाभूत प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) यांनी उघड केले आहे. त्यापैकी दिल्लीच्या द्वारका द्रुतगती महामार्गाचा निर्मितीखर्च प्रतिकिलोमीटर १८ कोटींवरून २५० कोटींपर्यंत वाढल्याचे उघड झाले. या सर्व गैरव्यवहारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. 

कॅगच्या अहवालात केंद्र सरकारच्या अख्यतारितील सात प्रकल्पांतील गैरव्यवहार झाल्यानंतर पंतप्रधान गप्प आहेत. कदाचित ते कॅगचा अहवाल तयार करणाऱ्यांना राष्ट्रद्रोही घोषित करून तुरुंगात टाकतील, असे कॉंग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या.
द्वारका द्रुतगती महामार्गाचा खर्च १८ कोटींवरून २५० कोटी झाल्याचा कॅगचा आरोप केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने फेटाळला. कॅगने मांडलेल्या अहवालात अन्य खर्च गृहित धरला नाही. त्यामुळे सरसकट खर्च वाढला म्हणणे योग्य नाही. उलट प्रकल्पाच्या एकूण खर्चात १२ टक्के बचत झाल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.

काँग्रेस म्हणते कॅगने दाखवला आरसा

भारतमाला प्रकल्प : महामार्ग निर्मितीच्या या प्रकल्पासाठी बांधकामाचा प्रतिकिलोमीटर खर्च १५.३७ कोटी रुपयांवरून तब्बल ३२ कोटी दाखवण्यात आला. त्याशिवाय निविदा प्रक्रियेतही काळेबेरे झाले असून सुमारे ३,५०० कोटी अन्यत्र वळवण्यात आले. सुरक्षा सल्लागाराचीही नेमणूक करण्यात आली नाही.

टोल घोटाळा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या केवळ पाच टोलनाक्यांद्वारे १३२ कोटींचा लूट करण्यात आली. सर्व टोलनाक्यांची तपासणी केल्यास हा आकडा कित्येक पट वाढू शकतो.

आयुष्मान भारत : ७.५ लाख लाभार्थ्यांची केवळ एका मोबाइल क्रमांकावरून नोंद करण्यात आली. तसेच उपचारादरम्यान मृत झालेल्या ८८ हजार रुग्णांचे बिल पास केले.

अयोध्या विकास प्रकल्प : कवडीमोल दराने भूखंड विकत घेऊन तो राम मंदिर ट्रस्टला चढ्या दराने विकण्यात आला. नोंदणीकृत नसलेल्या कंत्राटदारांना पैसे वळते करण्यात आले.

पेन्शनचा निधी फलकांवर खर्च : ज्येष्ठ नागरिक, गरीब, विधवा तसेच अपंगाच्या पेन्शनचा निधी ‘स्वच्छ भारत’ योजनेचे फलक लावण्यासाठी एका रात्रीत वळवण्यात आला.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स : सदोष इंजिन विकसित केल्यामुळे सुमारे १५४ कोटींचे नुकसान झाले.

द्वारका एक्स्प्रेस वे : प्रकल्पाच्या बांधकामाचा खर्च प्रतिकिलोमीटर १८ कोटींवरून सुमारे २५० कोटींवर दाखवला.

पैसा नेमका कुठे गेला?

कॅगने आक्षेप घेतलेल्या या गैरव्यवहारांबाबत पंतप्रधान गप्प का आहेत. लोकांच्या आरोग्याशी संबंधित आयुष्मान भारत योजनेलाही भ्रष्टाचाराची कीड लागली. हा पैसा नेमका कुठे गेला, असा सवालही कॉंग्रेसने केला.

 

Web Title: road worth 18 crores spent 250 crore cag report exposes malpractice in 7 projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.