अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते अधिक चांगले, शिवराज सिंह चौहान यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 10:13 AM2017-10-25T10:13:14+5:302017-10-25T12:30:28+5:30
अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते अधिक चांगले आहेत, असा दावा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे.
नवी दिल्ली - अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते अधिक चांगले आहेत, असा अजब-गजब दावा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. मंगळवारी (24 ऑक्टोबर)त्यांनी हे विधान केले आहे. शिवराज सिंह चौहान यांनी वॉशिंग्टन डीसीतील रस्त्यांच्या दुरावस्थेवर निराशा व्यक्त करत सांगितले की, जेव्हा मी वॉशिंग्टन डीसी विमानतळावर उतरलो आणि तेथून रस्त्यानं प्रवास केला. त्यावेळी मध्य प्रदेशातील रस्ते अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा चांगले असल्याचं जाणवलं.
शिवराज सिंह चौहान पाच दिवसांच्या अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. अमेरिकेच्या यूएसआयएसपी फोरमसोबत होणा-या बैठकीत शिवराज सिंह चौहान आपल्या प्रांतात गुंतवणूक करण्याच्या फायद्याची माहिती अमेरिकेला देणार आहेत.
दरम्यान, यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या जीएसटीच्या निर्णयाचीही स्तुती केली. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश महान आर्थिक विकासाच्या मार्गावर आहे. जीएसटी ही बदल घडवून आणणारी कर प्रणाली आहे''.
गुंतवणूकदारांसाठी 'एक देश, एक कर आणि एक बाजार' चं स्वप्न पूर्ण होण्यासारखं असल्याचेही चौहान म्हणाले.
अमेरिकेत बोलताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, जीएसटीमुळे भारतात व्यवसाय सुलभ झाला आहे. यावेळी त्यांनी मध्य प्रदेशातील रस्त्यांचीही स्तुती केली. मध्य प्रदेश सरकारनं जवळपास 1.75 लाख किलोमीटर पर्यंत रस्त्यांची बांधणी केली आहे आणि राज्यातील सर्व गावांना रस्त्यांनी जोडले आहे.
यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम (यूएसआईएसपीएफ) आणि सीआयआयतर्फे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी वॉशिंग्टन डीसी येथील अमेरिकी इतिहास संग्रहालयलाही भेट दिली. दरम्यान, शनिवारी शिवराज सिंह चौहान भारतात दाखल होतील.