इंदूर- केशर बाग रोडजवळ असणाऱ्या पॉश कॉलनीतील एका एटीएममध्ये चेहऱ्यावर रूमार बांधलेल्या एका व्यक्तीने बंदूकीच्या सहाय्याने व्यक्तीकडून पैसे लुटल्याची घटना समोर आली आहे. इंदिरा गांधी नगरमध्ये रहाणारे निर्मित पटेल एटीएमध्ये 1500 रूपये काढालया गेले होते. परिवारासह ते एटीएममध्ये गेले होते. तेथे त्यांना बंदूकीचा धाक दाखवून लुटण्यात आलं.
24 डिसेंबर 2017 रोजी रात्री 8 वाजून 38 मिनिटांनी ही घटना घडली आहे. निर्मित त्यांची पत्नी नेहा आणि मुलगी त्रिशासह एटीएममध्ये होते. मुलगी व पत्नीला कोपऱ्यात उभं करून निर्मित यांनी एटीएममधून 1500 रूपये काढले. त्यावेळी त्या एटीएममध्ये एक चोरटा आला. सुरूवातीला त्याने निर्मितला बंदूक दाखविली आणि धमकी दिली. चेहरा झाकलेल्या व्यक्तीने अचानक बंदूक दाखवून धमकी दिल्याने निर्मित यांनी एटीएममधून काढलेले 1500 रूपये व पर्समधील 300 रूपये असे एकुण 1800 रूपये त्याला दिले.
पण तरीही चोरट्याचं समाधान झालं नाही त्याने निर्मित यांच्या मुलीला निशाणा बनवत तिच्यावर बंदूक ताणली व निर्मितला एटीएममधून 40 हजार रूपये काढून द्यायला सांगितले. अकाऊंटमधून एकत्र इतके पैसे काढता येणार नाही, असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी 18 हजार 500 रूपये निर्मित यांना काढायला सांगितले. एटीएममध्ये पैसै काढायला इतर कुणी व्यक्ती येतं का याची निर्मित वाट पाहत होते. चोराला पैसे देणं टाळण्यासाठी निर्मित यांनी खोटा पासवर्डही टाकला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. निर्मित पैसे देत नाहीत हे पाहून चोरट्याने मुलीला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर निर्मित यांनी 8500 रूपये त्या चोरट्याला काढून दिले. पैसे मिळाल्यावर त्या चोरट्याने घटनास्थळावरून पळ काढला.