ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - राजस्थानमधल्या जमिन खरेदी विक्रीच्या प्रकरणावरून प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा पुन्हा अडचणीत आले असून एका वृत्तवाहिनीने वाड्रा यांनी एक भूखंड काही लाखांत खरेदी करून वर्षभरात काही कोटींना अस्तित्वात नसलेल्या कंपनीला विकल्याचे वृत्त दिले आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते संबित पात्रा यांनीही मंघलवारी पत्रकार परिषद घेत या वृत्तात तथ्य असल्याचे सांगितले.
संबित पात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार रॉबर्ट वाड्रा यांच्या कंपनीने बिकानेरमधला एक भूखंड ७९ लाख रुपयांना खरेदी केला आणि वर्षभरात तो दुस-या कंपनीला ५.४४ कोटी रुपयांना विकला. वाड्रा यांच्याकडे अशी कोणती क्लृप्ती आहे की त्यांना स्वस्तात भूखंड मिळतात आणि अनेक पटीने वाढून वर्षभरात प्रचंड नफा मिळतो.
पात्रा यांच्या सांगण्यानुसार वाड्रा यांच्या कंपनीचे नाव कोर्टात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले असून कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
भाजपा सरकार सूडबुद्धीने वागणार नाही, परंतु वाड्रा यांच्या प्रकरणात बेकायदेशीर व्यवहार झाल्याचे आणि पैशाची अफरातफर झाल्याचे दिसत असल्याचे पात्रा म्हणाले. रॉबर्ट वाड्रा व काँग्रेसने याबाबत खुलासा करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, माझ्यावर आणखी एक खोटा आरोप करण्यात आल्याची प्रतिक्रिया वाड्रा यांनी फेसबुकवर दिली आहे.