Haryana election result : नवी दिल्ली : हरयाणातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लोकभावनेच्या विरोधात असून हा लोकशाहीचा पराभव असून तंत्राचा विजय असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ईव्हीएमची बॅटरी ९९ टक्के होती, त्याठिकाणी काँग्रेसचे नुकसान झाले. तर जिथे ६५ टक्के बॅटरी होती, तिथे काँग्रेसचा विजय झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी हरियाणा निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली असून ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या आरोपावर सहमती दर्शवली आहे. एक्झिट पोलमधूनही काँग्रेसचे सरकार स्थापन होत असल्याचे दिसून आल्याचे रॉबर्ट वाड्रा म्हणाले.
पुढे रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, मी राजकारणात नाही, पण गेल्या १०-१५ वर्षांपासून अनेक पक्षांनी माझ्या नावाचा वापर केला. त्यामुळं मला राजकीय पद्धतींचा अवलंब करावा लागला. त्यांनी मला राजकारणात खेचलं आणि म्हणूनच मी राजकारणात रस घेतो. मी वेगवेगळ्या राज्यांतील लोकांना भेटतो आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय असतो. तसेच, निवडणुकीच्या निकालांबद्दल बोलताना ते म्हणाले की, कोणीही सरकार बनवेल, त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत.
काय आहे ईव्हीएम बॅटरी प्रकरण?काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि पवन खेडा यांनी काल मीडियाशी बोलताना अनेक गंभीर आरोप केले आहेत. हा निकाल अस्वीकारार्ह असल्याचे सांगत त्यांनी मतमोजणीतील त्रुटींबाबत नाराजी व्यक्त केली. हिसार, महेंद्रगढ आणि पानीपत जिल्ह्यांतून सातत्याने तक्रारी येत आहेत. याठिकाणी ईव्हीएमची बॅटरी ९९ टक्के होती. तिथे काँग्रेसचा पराभव झाला, असे सांगत खेडांनी ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा दावा केला. तसेच, ज्या ईव्हीएम मशीनशी छेडछाड झाली नाही तिथे मशीनची बॅटरी ६० ते ७० टक्के होती. तिथे आम्हाला विजय मिळाल्याचेही पवन खेडा यांनी सांगितले आहे. बॅटरीचे कारण देत मशीनमध्ये छेडछाड झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.