आता रॉबर्ट वाड्रांची होणार 'ईडी'कडून चौकशी?, कोर्टात अटकेची याचिका
By मोरेश्वर येरम | Published: January 17, 2021 06:18 PM2021-01-17T18:18:36+5:302021-01-17T18:19:34+5:30
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ईडीकडून रॉबर्ट वाड्रा आणि महेश नागर यांना अटक करुन त्यांच्या चौकशीची परवानगी हायकोर्टाकडे मागण्यात आली आहे.
नवी दिल्ली
उद्योगपती आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात राजस्थान हायकोर्टात अटकेची याचिका दाखल केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ईडीकडून रॉबर्ट वाड्रा आणि महेश नागर यांना अटक करुन त्यांच्या चौकशीची परवानगी हायकोर्टाकडे मागण्यात आली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रॉबर्ट वाड्रा यांची एएसजी राजदीपक रस्तोगी, तर ईडीकडून भानुप्रताप बोहरा बाजू मांडणार आहेत.
नेमकं प्रकरण काय?
२००७ साली वाड्रा यांनी स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली होती. रॉबर्ट वाड्रा आणि त्यांच्या मातोश्री मौरीन या कंपनीच्या संचालक पदावर आहेत. त्यानंतर कंपनीचं नाव बदलून स्कायलाइट हॉस्पीटॅलिटी लिमिटेड लायबिलीटी करण्यात आलं. कंपनीच्या नोंदणीवेळी ही कंपनी रेस्टॉरंट, बार आणि कॅंटीन चालविण्याच्या क्षेत्रात काम करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.
२०१२ साली खरेदी केली होती जमीन
वाड्रा यांच्या कंपनीने २०१२ साली जोधपूरच्या कोलायत येथे काही दलालांच्या माध्यमातून २७० बिघा जमीन ७९ लाख रुपयांमध्ये खरेदी केली होती. ही जमीन बिकानेर येथील भारतीय सेनेच्या महाजन फील्ड फायरिंग रेंजसाठी देण्यात आली होती. तर येथून विस्थापित झालेल्यांसाठी दुसऱ्या ठिकाणी १४०० बिघा जमीन देण्यात आली होती. पण काही लोकांनी या जमिनीचे खोटी कादगपत्र तयार करुन वाड्राच्या कंपनीला विकण्यात आले होती.