नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रॉबर्ट वाड्रा यांनी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे. तसेच, यासाठी मुराबादमध्ये बॅनरही लावण्यात आले आहेत.
रॉबर्ट वाड्रा यांनीही फेसबुकच्या माध्यमातून राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून लोकांच्या सेवेसाठी महत्वपूर्ण भूमिका करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच, त्यांनी केरळ, नेपाळ आदी पूरग्रस्त भागात केलेल्या आपल्या मदत कार्याचे फोटोही अपलोड केले आहेत. त्यांच्या या पोस्टनंतर मुरादाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे. तसेच, यासाठी मुराबादमध्ये बॅनरही लावण्यात आले आहेत. त्यामुळे रॉबर्ट वाड्रा राजकारणात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
याविषयी बोलताना रॉबर्ट वाड्रा म्हणाले, 'सर्वात आधी माझ्यावर असलेल्या तथ्यहीन आरोपातून मी मुक्त होणार आहे. मात्र, होय, मी यावर काम सुरु करणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची घाई करणार नाही. मी काही तरी बदल करु शकतो हे लोकांना वाटले पाहिजे... हे सर्व वेळेनुसार आहे.'
दरम्यान, काँग्रेसने रॉबर्ट वाड्रा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे वृत्त फेटाळले आहे. रॉबर्ड वाड्रा एनडीओच्या माध्यमातून समाजकार्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानाचा अर्थ हा समाजकार्यासंबंधीत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.