नवी दिल्ली – महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी पडत आहेत. राज्यात केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारवाईवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता आयकर विभागाने काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा(Robert Vadra) यांच्याविरोधात मोठा आरोप केला आहे.
आयकर विभागानुसार, मागील ११ वर्षात रॉबर्ट वाड्रा यांनी जवळपास १०६ कोटींचे उत्पन्न लपवलं आहे. त्यामुळे विभागाने ही रक्कम २०१०-११ ते २०२०-२१ या वर्षात मिळालेल्या उत्पन्नात जोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटल्याप्रमाणे वाड्रा यांनी ११ वर्षात, राजस्थानमधील बेनामी होल्डिंगमधून त्यांची कमाई १०६ कोटी रुपयांपेक्षा कमी असल्याचं दाखवलं. आयटी विभागाने वाड्रा यांच्या ७ कंपन्यांच्या (एम/एस आर्टेक्स, स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी, स्कायलाइट रियल्टी, ब्लूब्रीझ ट्रेडिंग, लंबोदर आर्ट्स, नॉर्थ इंडिया आयटी पार्क्स आणि रिअल अर्थ) च्या उत्पन्नात सुमारे ९ कोटी रुपये जोडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, जे सन २०१०-११ ते २०१५-१६ वर्षाचे सांगितले जात आहे.
उत्पन्न लपवल्याचा आरोप
बेनामी व्यवहार (प्रतिबंध) कायद्यांतर्गत, राजस्थानमधील जमिनीच्या व्यवहारातून मिळालेल्या उत्पन्नात वाड्रा यांच्या विरुद्ध विभागाच्या तपासात या मालमत्तेची माहिती लपवल्याचा आरोप आहे. IT विभागाने गेल्या वर्षी २०२१ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाला (ED) तपासात वाड्रा यांच्या जमीन व्यवहारातून १०६ कोटी आणि त्यांच्या ७ कंपन्यांच्या सुमारे ९ कोटींच्या उत्पन्नाशी संबंधित माहिती देखील शेअर केली होती.
रॉबर्ट वाड्रा यांनी दिलं स्पष्टीकरण
त्याचवेळी, या आरोपांबाबत रॉबर्ट वाड्रा म्हणतात की, आयकर विभागाने जो आरोप लावला आहे त्यावर त्यांची कायदेशीर टीमच याबाबत योग्य माहिती देऊ शकते. विशेष म्हणजे, बिकानेर जमीन व्यवहार आणि फरीदाबादमधील जमीन घोटाळ्याच्या आरोपांचा सामना करणार्या रॉबर्ट वाड्रा यांनी आपल्यावर चुकीचे आरोप लावण्यात आल्याचे अनेकदा सांगितले आहे. रॉबर्ट वाड्रा हे कॉंग्रेसचे अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई आहेत आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याशी त्यांचे लग्न झाले आहे.