नवी दिल्ली - सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान एक गंभीर गौप्यस्फोट झाला आहे. रॉबर्ट वाड्रा हे लंडनमधील एका फ्लॅटचे व्हर्चुअल ऑनर असल्याचा दावा ईडीने न्यायालयात केला आहे. या फ्लॅटची किंमत सुमारे 16 कोटी 80 लाख रुपये असल्याचे ईडीने म्हटले आहे. रॉबर्ट वाड्रा यांचे निकटवर्तीय मनोज अरोडा यांच्याविरोधा अजामिनपात्र वॉरंटसाठी ईडीने अरविंदा कुमार यांच्या विशेष न्यायालयात धाव घेतली होती. अरोडा हा ईडीने टाकलेल्या धाडींनंतर फरार झालेला आहे. दरम्यान, लंडनमध्ये खरेदी करण्यात आलेली संपत्ती मनी लाँड्रिंगमधील पैशातून खरेदी करण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे. मनोज अरोडा हा या व्यवहाराचा साक्षीदार आहे. तसेच या व्यवहाराविषयी सर्व काही माहित आहे, असा दावा ईडीकडून करण्यात येत आहे. हा फ्लॅट फरार संजय भंडारी याने 16 कोटी 80 लाख रुपयांना खरेदी केला होता. तसेच वाड्रा यांचे नियंत्रण असलेल्या फर्मने हा फ्लॅट त्याच किमतीत भंडारी याच्याकडून खरेदी केला होता. भंडारीविरोधात ऑफिशियर सिक्रेट अॅक्ट अंतर्गत 2016 साली गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, संजय भंडारी हा नेपाळमार्गे देशाबाहेर पसार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर प्राप्तिकर विभागाने भंडारीच्या दिल्ली आणि गुडगाव येथील मालमत्ता जप्त केल्या होता. मात्र भंडारीच्या ठावठिकाण्याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
तसेच मनोज अरोडा हासुद्धा दिल्ली आणि बंगळुरूस्थित त्याच्या संपत्तीवर ईडीने छापे टाकल्यापासून फरार आहे. दरम्यान अरोडा हा अनेक वेळा चौकशीसाठी बोलावूनही हजर राहिलेला नाही, असे ईडीने त्याच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंटची मागणी करताना कोर्टात सांगितले आहे. रॉबर्ट वाड्रा प्रकरणातील अनेक व्यवहारांच्या देवाणघेवाणीची माहिती, अरोडाला असल्याने त्याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे ईडीने म्हटले आहे.