नवी दिल्ली : काँगे्रस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांना विमानतळावर मिळणाऱ्या विशेष सवलती अखेर रद्द होणार आहेत. नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी सोमवारी नागरी उड्डयन सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली़ या बैठकीत त्यांनी केवळ शोभेसाठी सुरक्षा घेणाऱ्यांची सुरक्षा रद्द करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले़ प्रियंका गांधी-वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना अतिमहत्त्वांच्या व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा दिल्या जातात़ यामुळे विमानतळांवर त्यांची सुरक्षा तपासणी होत नाही़ केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर अनेकांनी वाड्रा यांना पुरविण्यात येणाऱ्या या विशेष सुविधांवर आक्षेप घेतला होता़ खुद्द नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांनीही याआधी वाड्रा यांच्या विशेष सुविधा रद्द करण्याचे संकेत दिले होते़ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी झालेल्या बैठकीत राजू यांनी, केवळ शोभेसाठी सुरक्षा मिरविणाऱ्यांच्या विशेष सुविधा रद्द करण्याचे आदेश दिले़ ज्यांच्या जीवाला खरोखरच धोका आहे, अशांनाच विशेष सुविधा पुरवा़ अन्य लोकांची नावे यातून वगळा, असे ते म्हणाले़ त्यामुळे वाड्रांच्या विशेष सुविधा रद्द होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत़
रॉबर्ट वाड्रा यांच्या विशेष सवलती रद्द होणार
By admin | Published: September 11, 2014 1:39 AM