नवी दिल्ली : गगनयान अंतराळात पाठवण्याची भारताची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. गगनयानच्या शेवटच्या प्रशिक्षण उड्डाणाचा भाग म्हणून या वर्षाच्या अखेरीस महिला रोबोट ‘व्योमित्र’ अंतराळात पाठवला जाणार असल्याची माहिती बुधवारी केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी बुधवारी लोकसभेत दिली.
भारताचे पहिले मानवी अंतराळ उड्डाण अभियान ‘गगनयान’साठी निवड केलेल्या चार अंतराळवीरांना प्रशासनाकडून सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवण्यात आले आहे. अंतराळ मोहिमेसाठी या चौघांचाही प्रशिक्षण कार्यक्रम सुरु आहे. त्यांचे लक्ष विचलित होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून अशी उपाययोजना केल्याचे जितेंद्र सिंग यांनी स्पष्ट केले.
सिंग म्हणाले की, प्रश्रोत्तराच्या तासातील पहिला प्रश्न अंतराळाशी संबंधित आहे. योगायोग म्हणजे पहाटेच अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर दाखल झाल्या आहेत. शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या पूरक प्रश्नाचे उत्तर देताना सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम्सला लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला.
‘गगनयान’ची ड्रेस रिहर्सलगगनयान पाठवण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. यासाठी शेवटचे प्रशिक्षण उड्डाण हे एक प्रकारचे ड्रेस रिहर्सल असेल. याअंतर्गत व्योमित्र ही महिला रोबट या वर्षाच्या शेवटी अंतराळात जाणार असून, ती सुरक्षितरीत्या परतणार आहे. या अभियानासाठी ग्रुप कॅप्टन प्रशांत बालाकृष्णन नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन व शुभांशू शुक्ला यांची निवड केल्याचे त्यांनी सांगितले.