कुपवाड (जि़सांगली) : गुजरातमधील इंटरनॅशनल इंडियन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांकडून साखरेच्या इंधनाचा वापर करून बनविण्यात आलेल्या रॉकेटने शनिवारी मिरजेतील क्रीडांगणावर अपेक्षित उद्दिष्ट गाठत आकाशात भरारी घेतली. संजय भोकरे ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या मैदानावरून रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले़ स्पेस टेक्नॉलॉजीसह रॉकेट प्रक्षेपणाचा थरार सांगलीकरांनी अनुभवला. ‘नासा’नेही या रॉकेट प्रक्षेपणाची दखल घेऊन संशोधकांचे अभिनंदन केले. भोकरे ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटमध्ये या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे रिसर्च सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ तीन महिन्यांपासून प्रक्षेपणाची तयारी सुरू होती. प्रक्षेपणस्थळाच्या जवळच इंधनाचा डेपो असल्याने दीड किलोमीटरपर्यंतच रॉकेटचे प्रक्षेपण यशस्वीरीत्या करण्यात आले़ रॉकेट तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांसाठी करता येणार आहे़ दुष्काळी भागात कमी खर्चामध्ये पाऊस पाडता येईल़ शासनाचा खर्चही वाचेल़ अतिवृष्टीही थांबविता येईल़, असे इंटरनॅशनल इंडियन युनिव्हर्सिटीचे कुलगुरू किरण नाईक यांनी सांगितले. (वार्ताहर)
साखरेच्या इंधनावर झेपावले रॉकेट
By admin | Published: September 08, 2014 2:39 AM