खर्डा : सातेफळ (ता. जामखेड) ग्रामपंचायतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत हाती घेतलेले ग्राम स्वच्छतेचे काम भविष्यात महाराष्ट्रात रोल मॉडेल ठरेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे केले.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांच्यासमवेत त्यांनी ग्रामपंचायतीस भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी अतुल पाटील, उपअभियंता एस. जी. गायकवाड, शाखा अभियंता विजय कांबळे, स्थापत्य सहायक केरूळकर हजर होते. सरपंच गणेश लटके यांनी विकास कामे दाखवून त्यांची माहिती दिली. रस्ता रुंदीकरण, जुने वाडे व घरे वापरात नसल्याने ते पाडून मोकळी जागा करुन गावातील उकिरडे गावाबाहेर नेले. हा आदर्श उपक्रम स्फूर्तीदायक असून आदर्श गाव म्हणून सातेफळची ओळख महाराष्ट्रास होईल,असेही बिनवडे म्हणाले. याप्रसंगी उपसरपंच गजेंद्र खुपसे, ग्रामपंचायत सदस्य शांतीलाल झांबरे, किरण भोसले, नवनाथ थोरात, नवनाथ पाचारणे, दादा लटके, सुनील सदाफुले, आर.के.टकले, ग्रामविकास अधिकारी रमेश राठोड आदी हजर होते. (वार्ताहर)
सातेफळचे काम रोलमॉडेल
By admin | Published: October 05, 2016 12:20 AM