बांगलादेशात (Bangladesh) रोहिग्या शरणार्थिची समस्या (Rohingya Refugees Crisis) सातत्याने वाढताना दिसत आहे. खरे तर बांगलादेश, या रोहिंग्या शरणार्थींना त्यांच्या देशात पाठविण्याचा प्रयत्नही करत आहे. यातच आता, गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दृष्टीने आणि अंमली पदार्थांचे (Drugs) स्मगलिंग रोखण्याच्या दृष्टीने, आवश्यकता भासल्यास रोहिंग्या शरणार्थींच्या कॅम्पमध्ये लष्कर तैनात करण्यात येईल, असे बांगलादेशचे गृह मंत्री (Home Minister) असदुज्जमां खान कमाल (Asaduzzaman Khan Kamal) यांनी म्हटले आहे.
कॉक्स बाजारात 7 पटींनी वाढली गुन्हेगारी - बांगलादेशातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, कॉक्स बाजार भागात गेल्या पाच वर्षांत हत्या, लूट-मार, बलात्कार, ड्रग्स स्मगलिंग आणि इतरही विविध प्रकारचे गुन्हे जवळपास सात पटींनी वाढले आहेत. महत्वाचे म्हणजे, यापूर्वी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. त्या अनेक वेळा आपल्या भाषणात पोलीस रिपोर्टचा हवाला देत म्हणाल्या होत्या, की काही रोहिंग्या शरणार्थी गुन्हेगारी प्रवृत्तीचे नेतृत्व करत आहेत आणि ते कॅम्प कट्टरपंथी संघटनांसाठी गड बनले आहेत.
रोहिग्यांना परत पाठवण्याच्या प्रयत्नात बांगलादेश - यातच, 'गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रोहिंग्या शरणार्थींचे मोबाईल फोन ट्रॅक केले जातील,' असे बांगलादेशचे गृह मंत्री असदुज्जमां खान यांनी म्हटले आहे. याशिवाय, रोहिंग्यांना लवकरच परत पाठविले जाईल. यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.
महत्वाचे म्हणजे, 2017 मध्ये म्यांमारच्या लष्करी कारवाईला घाबहून तेथून पळ काढलेल्या रोहिंग्या शरणार्थींचे बांगलादेशने खुल्या हातांनी स्वागत केले होते. मात्र, आता त्यांची वेगाने वाढत असलेली लोकसंख्या आणि गुन्हेगारीतील त्यांचा कथित सहभाग यामुळे सरकारवरील दबाव वाढत आहे. कारण बांगलादेश पाच वर्षांनंतरही या संकटावरील समाधान शोधण्यासाठी संघर्ष करत आहे.