ऑनलाइन लोकमत -
साऊथ पोर्ट (लंडन), दि. 20 - हैद्राबादच्या रोहित खंडेलवालने 'मिस्टर वर्ल्ड 2016' चा किताब जिंकला आहे. साऊथपोर्ट थिएटरमधील फ्लोरल हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात रोहित खंडेलवालला 'मिस्टर वर्ल्ड 2016' चा किताब देण्यात आला. विशेष म्हणजे प्रथमच एका भारतीयाने ही स्पर्धा जिंकत 'मिस्टर वर्ल्ड 2016' खिताबावर आपलं नाव कोरलं आहे. हा बहुमान पटकवणारा तो पहिलाचा आशियाई, आणि पर्यायाने पहिलाच भारतीय पुरुष ठरला आहे.
रोहितसाठी ही स्पर्धा फारच कठीण होती. रोहितसमोर जगभरातील 47 स्पर्धकांचं आव्हान होतं. पण रोहितने सर्व स्पर्धकांना मागे टाकत ही स्पर्धा जिंकून खिताब आपल्या नावावर केला. रोहितला 50 हजार डॉलरचं (33 लाख 60 हजार) बक्षिसही देण्यात आलं आहे. रोहितने यावेळी डिझाईनर निवेदिता साबूने डिझाईन केलेले कपडे घातले होते. रोहितला या स्पर्धेसाठी तयार करण्याकरिता 20 लोकांच्या टीमने मेहनत घेतली होती. रोहित खंडेलवालने 2015 मध्ये 'प्रोवोग पर्सनल केअर मिस्टर इंडिया 2015' स्पर्धाही जिंकली होती.
रोहितने प्यार तुने क्या किया, ये है आशिकी सारख्या मालिकांमध्ये अभिनय केला आहे. 12 दिवस चाललेल्या या पेजंटमध्ये 5 चॅलेंजेस होते. त्यापैकी 'मिस्टर मल्टीमीडिया' हा किताबही रोहितला मिळाला. मिस्टर पोर्तो रिको पहिला रनर अप, तर मिस्टर मेक्सिको दुसरा रनरअप ठरला.