अहमदाबाद/मुंबई - भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दणदणीत विजयाची नोंद करताना मालिका २-१ अशी जिंकली. शुभमन गिलचे ( Shubman Gill) विक्रमी शतक आजच्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. शुभमनने आजच्या या नाबाद १२६ धावांच्या खेळीने मोठमोठे विक्रम मोडले. त्याच्या फटकेबाजीनंतर भारतीय जलदगती गोलंदाजांनी कमाल केली. त्यात सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) टिपलेले तीन भन्नाट झेल, सामन्याला कलाटणी देण्यासाठी पुरेसे ठरले. षटकारांची आतषबाजी करणारा हा सामना डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. अहमदाबादमध्ये हा सामना पाहण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार हेही उपस्थित होते.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा सर्वात मोठा विजय झाला. त्यामुळे, टीम इंडियाचं सर्वत्र कौतुक होत आहे. हा सामना कोट्यवधी भारतीय घरी बसून पाहत होते, तसेच अहमदाबादच्या स्टेडियमवरही मोठी गर्दी होती. या गर्दीत राजकीय नेत्यांचाही समावेश होते. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेही या सामन्याला उपस्थित होते. तसेच, बीसीबीआयचे सचिव जय शहा आणि खजिनदार व भाजप नेते आशिष शेलार हेही सामना पाहण्यासाठी होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही या नेत्यांसमेवत विशेष गॅलरीत बसून या सामन्याचा आनंद घेतला. स्वत: पवार यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली.