हैदराबाद : हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील (एचसीयू) आंदोलन आणखी तीव्र झाले. रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्या निषेधार्थ संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या ‘चलो हैदराबाद विद्यापीठ (एचसीयू)’ रॅलीत सोमवारी देशातील शेकडो विद्यार्थ्यांनी भाग घेतला. याचदरम्यान भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय, कुलगुरू पी. अप्पा राव पोडिले, अ. भा. विद्यार्थी परिषदेचे नेते व भाजपा आमदार एन. रामचंद्र राव यांच्याविरुद्ध कारवाई करा, तसेच रोहितच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई द्या, विद्यापीठात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास वर्ग व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी ‘रोहित कायदा’ पारित केला जावा, या मागण्यांसाठी ही रॅली काढली गेली. (वृत्तसंस्था)