- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - रोहित वेमुला अनुसूचित जातीचा नव्हता असा निर्वाळा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्थापन केलेल्या एक सदस्यीय न्यायालयीन आयोगाने आपल्या अहवालात दिला आहे. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील संशोधनवृत्तीचा विद्यार्थी रोहित वेमुलाने कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली होती याची चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. जानेवारी महिन्यात रोहित वेमुलाने आत्महत्या केली होती ज्यानंतर देशभरातून विविध संघटनांनी निषेध व्यक्त केला होता.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिलेल्या या माहितीमुळे आत्महत्या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. स्मृती इराणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रीपदी असताना अलाहाबादचे माजी न्यायाधीश ए के रुपनवाल यांचा एकसदस्यीय आयोग स्थापना केला होता. ऑगस्ट महिन्यात ए के रुपनवाल यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) आपला अहवाल सादर केला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि थावरचंद गेहलोत यांनी रोहित वेमुलाच्या जातीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. सुषमा स्वराज आणि गेहलोत यांनी रोहित वेमुला वड्डेरा समाजाचा समाजाचा घटक असल्याचा दावा केला होता. वड्डेरा समाज इतर मागासवर्गीय प्रवर्गात (ओबीसी) येत नसून रोहित वेमुलाच्या आत्महत्येला जाणुनबुजून जातीय रंग दिला जात असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
रोहित वेमुलाची जात कोणती आहे हे जाणून घेणं महत्वाचं झालं आहे कारण हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव आणि केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. दोघांवरही रोहित वेमुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्यासाठी जबाबदार धरण्यात आलं होतं.
माजी न्यायाधीश ए के रुपनवाल यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र आपण अहवाल सादर केल्याच्या वृत्ताला त्यांनी नकारही दिलेला नाही. 'मी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. तुमचे सर्व प्रश्न तुम्ही सरकारला विचारा', असं रुपनवाल म्हणाले आहेत.
केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचा नव्याने कारभार हाती घेतलेल्या प्रकाश जावडेकरांना मात्र याबद्दल काहिच माहिती नसल्याचं दिसत आहे. पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारलं असता तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती असल्याचं ते बोलले आहेत. 'मी पाच दिवसांसाठी शहराबाहेर होतो. मी हा अहवाल पाहिलेला नाही. अनुदान आयोगाकडे (यूजीसी) हा अहवाल दिला असावा, मला तो पाहावा लागेल', असं प्रकाश जावडेकर म्हणाले आहेत.
रोहित वेमुलाच्या भावाने मात्र अहवालातील माहिती नाकारली आहे. 'आम्ही दलितांप्रमाणेच राहिलो आहोत. दलित समाजात आम्ही वाढलो. माझे वडिल मागासवर्गीय होते हे खऱं आहे, पण मला जितकी माहिती आहे त्यानुसार आम्ही दलितांप्रमाणेच राहत आहोत. आम्हाला नेहमी भेदभावाला सामोरं जाव लागलं आहे', असं रोहितचा भाऊ राजाने सांगितलं आहे.