नवी दिल्ली, दि. 16 - हैदराबाद युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येबाबत न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालात वेगळीच माहिती समोर आली आहे. रोहित वेमुलाने वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या केली होती, तसंच तो दलितही नव्हता, अशी माहिती न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालात पुढे आली आहे. याशिवाय रोहितला आणि त्याच्या मित्रांना वसतिगृहातून काढून टाकल्याने तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला यामध्येही तथ्य नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. काय म्हटलंय अहवालात- रोहित वेमुला याला अनेक समस्यांनी ग्रासलं होतं, तसंच अनेक कारणांमुळे तो नाराज होता. त्याला स्वत:च्या अनेक समस्या होत्या आणि जगातील अनेक घडामोडींवर तो नाराज होता हे रोहित वेमुलाच्या सुसाइड नोटमधून हे स्पष्ट होतं. त्याने सुसाइड नोटमध्ये आत्महत्येसाठी कोणालाही दोषी ठरवलं नव्हतं. जर रोहित वेमुला विद्यापीठाच्या निर्णयावर नाराज असता तर त्याविषयी त्यानं स्पष्टपणे लिहिलं असतं. पण त्यानं तसं काहीही केलं नाही. यामुळे हे स्पष्ट होतं की विद्यापीठाची तत्कालीन परिस्थिती रोहितच्या आत्महत्येला कारणीभूत नाही,' असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तो बालपणापासून एकटाच होता. त्याचं कधी कोणी कौतुक केलं नाही. यामुळेही तो निराश होता, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. स्मृती इराणी आणि बंडारू दत्तात्रेय यांनाही क्लीन चीट-अहवालामध्ये तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि भाजपा नेते बंडारू दत्तात्रेय यांनाही क्लीन चीट देण्यात आली आहे. स्थानिक आमदार रामचंद्र राव, , केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय आणि स्मृती इराणी हे केवळ आपली जबाबदारी पार पाडत होते व त्यांनी विद्यापीठ प्रशासनावर कोणताही दबाव आणला नाही असं या अहवालात म्हटलं आहे.
हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुलाने १७ जानेवारी २०१६ रोजी वसतिगृहातल्या खोलीत आत्महत्या केली होती. त्यानंतर देशभरात मोठे आंदोलन पेटले होते.