ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २८ - जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारच्या समर्थनार्थ जेएनयू कॅम्पसमध्ये अजूनही लावण्यात आलेले पोस्टर्स तसेच आहेत. कॅम्पसमध्ये लावण्यात आलेले 'रोहित का जेएनयू' पोस्टर्स भिंतीवर अजून तसेच आहेत. जेएनयूमधील विद्यार्थी आणि शिक्षक आतुरतेने कन्हैय्या कुमार पुन्हा परत येण्याची वाट पाहत आहेत. कन्हैय्या कुमार देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक असून सध्या तो तिहार जेलमध्ये आहे.
आम्ही एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन दिल्याने तसंच रोहित वेमुला प्रकरणाला राष्ट्रीय मुद्दा बनवल्याने आम्हाला लक्ष केलं जात आहे. गेल्या आठवड्यात रोहितच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत कन्हैय्या सहभागी होणार होता. मात्र सत्तेत असणारे त्याला याच कारणासाठी लक्ष करत असल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेची उपाध्यक्ष शेहला रशीद शोरा यांनी केला आहे.
कन्हैय्याचा जामीन अर्ज सारखा फेटाळला जातोय आणि त्याच्या कोठडीत वाढ केली जात आहे. कन्हैय्या लवकरच कॅम्पसमध्ये परत येईल आणि विद्यापीठाला देशद्रोह्यांची जागा असल्याचं जे ब्रॅडींग केलं जात आहे, त्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी होईल अशी आशा शेहला रशीद शोरा यांनी व्यक्त केली आहे. कन्हैय्याच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.