ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. १९ - विद्यापीठ हे ज्ञान मिळवण्याचा केंद्र असून, विद्यार्थ्यांना इथे आपले विचार, नव्या कल्पना मांडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. पण हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठात ठराविक विचारधारा लादण्याचा प्रयत्न झाला असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी म्हणाले.
हैदराबाद विद्यापीठात शिकणा-या रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर विद्यापीठात आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी हैदराबाद विद्यापीठात आले होते.
रोहितने आत्महत्या केली हे खर असलं तरी, त्याने आत्महत्या करावी अशी स्थिती विद्यापीठाचे कुलगुरु आणि मंत्र्याने निर्माण केली. मंत्री आणि मंत्रालय निष्पक्ष नव्हते असा आरोप राहुल यांनी केला. रोहितच्या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळाली पाहिजे ही विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. ही नुकसान भरपाई फक्त आर्थिक स्वरुपात नसावी, आदर, नोकरी मिळाली पाहिजे असे राहुल म्हणाले.
या घटनेला जे कोणी जबाबदार आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असे राहुल म्हणाले. विद्यार्थी कुठल्याही जाती, धर्मचा असो त्याला मुक्तपणे आपले विचार, कल्पना मांडण्यासाठी अधिकार मिळालेच पाहिजेत असे राहुल म्हणाले. मी इथे राजकारणी म्हणून नव्हे तर तरुण म्हणून आलो आहे. माझ्या घराचे दरवाजे नेहमीच तुमच्यासाठी उघडे असतील असे राहुल यांनी सांगितले.