नवी दिल्ली - हुंडा घेणं हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र आजही अनेक भागात हुंडा घेतला जातो. भेटवस्तूच्या नावाखाली लाखो रुपये, दागिने यांची मागणी हमखास केली जात. मात्र याच दरम्यान आता एक अनुकरणीय घटना समोर आली आहे. एका तरुणाने हुंडा नाकारून अनोखा आदर्श निर्माण केला आहे. हरियाणाच्या रोहतकमध्ये ही घटना घडली आहे. एक तरुणाने मुलीच्या आईवडिलांकडून देण्यात येणारा हुंडा आणि भेटवस्तू नाकारल्या आहेत. त्याने कोणत्याही स्वरुपाच्या वस्तू लग्नामध्ये घेण्यास नकार दिला आहे. सर्वत्र या तरुणाचं भरभरून कैतुक केलं जात आहे.
विशेष म्हणजे तरुणाने हुंड नाकारून आपल्या एका मित्राची बाईक उधारीवर घेऊन नववधूला त्यावरून घरी आणलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओ हा सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निंदाना गावात राहणाऱ्या संजीत नेहरा या तरुणाचं लग्न ठरलं होतं. या लग्नासाठी सासरच्या मंडळींनी लाखो रुपयांचा हुंडा देण्याची तयारी दाखवली होती. मात्र आपण काहीही झालं तरी लग्नात हुंडा घ्यायचा नाही, हा निर्णय़ पक्का केला होता. त्याने लग्न ठरल्यानंतर आपल्या सासरच्या मंडळींना आपला निर्णय स्पष्टपणे सांगून टाकला.
हुंडा आणि भेटवस्तू नाकारून नवरदेवाने दिला आश्चर्याचा धक्का
नवरदेवाने आपण लग्नात हुंडा घेणार नसल्याचं सांगत त्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या या निर्णयाचं सर्वांनाच कौतुक वाटलं आहे. संजीतने फक्त हुंडाच नव्हे, तर लग्नात दिल्या जाणाऱ्या वस्तूदेखील नाकारल्या आहेत. लग्नाच्या रुखवतात दिली जाणारी भांडी आणि इतर संसारोपयोगी वस्तूदेखील आपण घेणार नसल्याचं त्यानं स्पष्ट केलं. हुंडा न घेणं यात काहीही विशेष नसल्याचं सांगत तो घेणं हे कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्यादेखील चुकीचं असल्याचं मत त्यानं व्यक्त केलं आहे.
पत्नीला चक्क मित्राच्या बाईकवरून नेलं घरी
हरियाणातील एका कंपनीत क्लार्क म्हणून काम करणाऱ्या संजीतने आपल्या कृतीनं सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. तसेच त्याने लग्नानंतर आपल्या पत्नीला चक्क मित्राच्या बाईकवरून घरी नेलं. व्यक्तीपेक्षा पैसा कधीच मोठा असू शकत नाही, अशी प्रतिक्रिया संजीतनं दिली आहे. ज्या व्यक्तीला आपण साता जन्माचे सोबती म्हणून घरी आणत आहोत, त्याच्याकडून पैशांची मागणी करणं हे मनाला न पटणारं असल्याचं देखील त्याने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.