नवी दिल्ली - हरियाणाच्या रोहतकमध्ये भाजपाच्या एका कार्यक्रमादरम्यान खासदार अरविंद शर्मा यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. जर कोणीही हरियाणाचे माजी मंत्री मनीष ग्रोवर यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे डोळे फोडून टाकू, हात कापून टाकू अशी धमकी भाजपाचे अरविंद शर्मा यांनी शनिवारी दिली. भाजपाने रोहतकमध्ये काँग्रेसविरोधात आंदोलन केले. शेतकरी आणि गावकऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे मनीष ग्रोवर आणि इतर अनेक भाजपा नेते शुक्रवारी हरियाणाच्या रोहतकमधील एका मंदिराच्या संकुलात काही तास बंदिस्त होते. अरविंद शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
अरविंद शर्मा (BJP Arvind Sharma) यांनी रोहतक येथील एका मंदिरात मनीष ग्रोवरसह भाजपाच्या काही नेत्यांना ओलीस ठेवण्यात आल्यानंतर धमकावलं आहे. या घटनेला त्यांनी काँग्रेसला (Congress) जबाबदार धरलं आहे. "जर मनीष ग्रोवरकडे कोणी डोळे वर करून पाहिलं तर डोळे काढून टाकले जातील आणि जर कोणी हात उचलला तर तो हात आम्ही कापून टाकू, आम्ही कुणालाही सोडणार नाही" असं वादग्रस्त विधान केलं आहे. या घटनेने राजकारण तापलं असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
"सत्तेसाठी काँग्रेस रचतेय कट"
"काँग्रेस आणि पक्षाचे नेते भूपेंद्र हुड्डा आणि त्यांचा मुलगा दीपेंद्र हुड्डा हा ग्रोवर यांना लक्ष्य करत आहे. मनीष ग्रोवरमुळे आम्ही रोहतक लोकसभा जागा जिंकली यात शंका नाही. सत्तेसाठी काँग्रेस कट रचत आहे. पण पुढच्या 25 वर्षांत काँग्रेसची सत्ता येईल हे विसरून जा" असं अरविंद शर्मा यांनी म्हटलं आहे. रोहतकमध्ये या राजकारणामुळे सध्या परिस्थिती बिघडली आहे. आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेस आणि भाजपा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.