नवी दिल्ली - आजपासून नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कालावधीतील पहिल्या अधिवेशनाला सुरुवात होत आहे. लोकशाहीत विरोधकांची ताकद महत्त्वाची असते, विरोधकांचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी महत्वाचा आहे. विरोधकांनी संख्याबळाची चिंता करु नये. सभागृह चालविण्यासाठी विरोधकांनी कामकाजात सहभागी व्हावं असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केलं. संसदेच्या अधिवेशनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकांच्या अपेक्षा, स्वप्न घेऊन आजपासून संसदेचं अधिवेशन सुरु होत आहे. पहिल्यांदाच महिला खासदारांची संख्या या 17 व्या लोकसभेत सर्वात जास्त आहे. अनेक अडचणींवर मात करत बहुमतामध्ये पुन्हा एकदा जनतेने भाजपाला सत्तेत आणलं आहे. देशाची सेवा करण्याची आणखी एक संधी लोकांनी आम्हाला दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच जनतेच्या हितासाठी घेण्यात येणाऱ्या निर्णयांना पाठिंबा द्यावा असं आवाहन मोदींनी सर्व पक्षांना केलं. तसेच येणाऱ्या 5 वर्षामध्ये सदनाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न हे सरकार कायम करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला दिला. दरम्यान आज नवीन खासदारांचा परिचय होणार असून गेल्या पाच वर्षात देशहिताचे निर्णय झाले. आगामी पाच वर्षात देशहिताचे निर्णय होतील असंही मोदींनी सांगितले.
शेतकऱ्यांची बिकट अवस्था, बेरोजगारी, दुष्काळ, जम्मू-काश्मीरमधील निवडणुका यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा घडवून आणावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केंद्र सरकारकडे केली आहे. संसदेचे अधिवेशन आजपासून सुरु होऊन ते २६ जुलैपर्यंत चालणार आहे. ५ जुलै रोजी अर्थसंकल्प मांडला जाईल. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने सर्व पक्षांची एक बैठक रविवारी आयोजित केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांच्यासह अन्य पक्षांचे नेतेही उपस्थित होते. तसेच देशभरात लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षांच्या अध्यक्षांची एक बैठक येत्या बुधवारी बोलावली आहे.