नवी दिल्ली : देशात सहकारी आणि स्पर्धात्मक संघराज्यावर अधिक भर दिला जात असल्यामुळे राज्यपाल आणि नायब राज्यपाल यांची भूमिका महत्त्वाची बनली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी केले.येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यपाल आणि नायब राज्यपालांच्या दोनदिवसीय परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कोविंद यांनी सांगितले की, देशातील सर्वच राज्यपालांना सार्वजनिक जीवनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्याचा जास्तीत जास्त लाभ देशातील जनतेला व्हायला हवा. राष्ट्रपती भवनाच्या वतीने अधिकृतरीत्या जारी करण्यात आलेल्या निवेदनात राष्ट्रपती कोविंद यांच्या भाषणाची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार कोविंद यांनी म्हटले की, आपण हल्ली सहकारी संघराज्य आणि निरोगी स्पर्धात्मक संघराज्य यावर भर देत आहोत. या पार्श्वभूमीवर राज्यपालांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. सहकारी संघराज्य म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांनी परस्परविरोधी धोरणांऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेऊन एकसमान धोरणांवर काम करणे होय. स्पर्धात्मक संघराज्य म्हणजे राज्यांनी परस्परांशी, केंद्राशी स्पर्धा करणे होय.बांधिलकी...कोविंद यांनी सांगितले की, घटनेचे संरक्षण करणे एवढेच मर्यादित काम राज्यपालांचे नाही. आपल्या राज्यातील लोकांच्या सेवेत सातत्याने कार्यरत राहण्याशी त्यांची बांधिलकी आहे. अंतिमत: आपण सगळेच लोकांसाठी काम करतो. आपण लोकांना उत्तरदायीही आहोत.
बदलत्या काळात राज्यपालांची भूमिका अधिक महत्त्वाची - राष्ट्रपती रामनाथ कोविंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 3:15 AM